पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 २.०३ मालक-मजूर, व्यवस्थापन, धंदा-उद्योग यांचा विचार करत असताना आत्मा-परमात्म्याची भानगड कुठे आली असा प्रश्न वाचकाच्या मनात उठणे स्वाभाविक आहे. कुठलाही माणूस हा कोणत्यातरी समाजाचा . घटक असतो. त्या समाजाच्या काही मूळ संकल्पना समान असतात. त्या मूळ संकल्पनांची स्पष्ट ओळख जर तुम्हाला 'व्यवस्थापक' म्हणून नसेल तर त्या तुमच्याबरोबर काम करणाऱ्या माणसांच्या मनापर्यंत तुम्ही पोचू शकत नाही. देवाचे अस्तित्व नाकारून किंवा तशी भूमिका घेऊन तुम्ही ख्रिश्चन, मुसलमान किंवा ज्यू धर्मपंथांचे अनुयायी असणाऱ्या समाजाला समजू शकणार नाही. बहुतांश हिंदू संस्कारांत वाढलेल्या समाजाला तुम्हाला समजून घेता येणार नाही. माणसांना किंवा त्यांच्या समाजाला जर तुम्हाला समजून घेता आले नाही तर मग त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे करणार ? तुमची वैयक्तिक श्रद्धा।अश्रद्धा काहीही असली तरी परिणामकारक व्यवस्थापनासाठी इतरांच्या संचिताबद्दल माहिती असायला हवी. माणसामाणसांमधले संबंध समजून घ्यायचे असतील, एखाद्या प्रदेशातल्या लोकांकडून काम करून घ्यायचे असेल, उत्पादन करून घ्यायचे असेल, त्यांना एखादे उत्पादन विकायचे असेल, धंदा करायचा असेल, निवडणूक जिंकायची असेल, राज्य करायचे असेल तर त्या त्या विशिष्ट प्रदेशातल्या किंवा समाजातल्या लोकांच्या संस्कृतीचा, परंपरांचा, लोकमानसाचा मूलाधार तुम्हाला माहीत असायला हवा. एवढेच नव्हे तर त्याचे लोकव्यवहाराशी असलेले प्रत्यक्ष नाते समजून घ्यायला हवे. ते जर समजून घेतले नाही तर सारे प्रयत्नच फोल ठरतात.
 २.०४ भारतातल्या जवळजवळ सर्व माणसांच्या मनांत आत्म्यापरमात्म्याची कल्पना जाणते-अजाणतेपणे शब्द म्हणून तरी रुजलेली असते. ती व्यवस्थापकाच्या श्रद्धेचा विषय झाली तर उत्तमच, पण अगदी व्यावसायिक पातळीवर विचार करायचा झाला तरी असली गृहीतकृत्ये, मूळ मूल्ये ही तुम्हाला ध्यानात घ्यावी लागतात. विनोबांनी एका ठिकाणी म्हटले आहे, की युक्लिडच्या भूमितीची सुरुवात बिंदूच्या व्याख्येने होते. बिंदूला लांबी, रुंदी किंवा खोली नसते. ही परिमाणे नसतील तर तुम्ही बिंदू 'पाहणार' कसा? युक्लिडच्या भूमितीत बिंदू या संकल्पनेचे अस्तित्व गृहीत धरून मग त्यावर रेषा, सरळ रेषा, कोन, वर्तुळ, त्रिकोण या पायऱ्या पायऱ्यांनी सर्व अभियांत्रिकी शिकवली जाते. आरेखने, नकाशे बनवले जातात, यंत्रे, इमारती बांधल्या जातात. लोकव्यवहार चालवला जातो. विनोबा म्हणतात, की "बिंदूच्या

व्याख्येत किंवा बिंदूच्या अस्तित्वाबद्दलच्या शंकेत तुम्ही अडकून राहिलात तर

सुरवंटाचे फुलपाखरू ७