२.०१ माणसाच्या आयुष्याची सुरुवात श्वासाने होते व शेवट श्वास थांबण्याने होतो. त्यामुळे भारतीय योगास्त्राच्या विचारात श्वासोच्छ्वासाच्या नियंत्रणाला म्हणजेच प्राणायामाला महत्त्व दिले जाते. भारतीय मानसशास्त्रात पतंजलीने त्यावर साऱ्या योगसूत्रांची आखणी केली आहे. योग याचा मूळ अर्थ जोडणे असा आहे. त्यात मुळात काय जोडायचे हे माहीत असायला हवे.
२.०२ भारतीय दर्शनांत प्रत्येक सजीवाच्या हृदयात असणारा ज्योतिःपिंड किंवा स्व किंवा आत्मा हे गृहीत प्रमेय आहे. ही मूळ संकल्पना आहे. वेदान्त, योग, सांख्य या दर्शनांत आत्म्याच्या ओळखीवर भर आहे. सारी खटपट 'मी कोण?' हे जाणण्याची आहे. म्हणजे स्व-चा अनुभव घेण्याची आहे. 'कोहम्' हा मूळ प्रश्न आहे. अध्यात्मशास्त्र याचा अर्थ आत्म्याला जाणून घेण्याचे शास्त्र. प्रत्येक जीवाच्या आत असणारा आत्मा हा सर्व जगाला व्यापून राहणाऱ्या परमात्म्याचा, परब्रह्माचा अंश आहे. त्यामुळे परमात्मा ही दुसरी महत्त्वाची संकल्पना आहे.जे 'ईश्वर', 'अला'. 'गॉड' मानतात ते त्या संकल्पनेचे परब्रह्माशी साधर्म्य मानू शकतात. ईश्वराचे अस्तित्व मानणे हा भारतीय तत्त्वज्ञानातल्या काही दर्शनांचा आधार आहे, पण सर्वांचा नव्हे. आत्मा व परमात्मा या दोन संकल्पना आणि त्यांचे एकावयवी स्वरूप सर्व दर्शनांत समान आहे.