पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राष्ट्रीय विचार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटनात्मक संस्कार माझ्या मनावर आहेत. भारतातल्या 'धर्म' या संकल्पनेचा आधार आणि त्या मर्यादेतच 'अर्थ' व 'काम' यांचा विचार व्हायला हवा, पण त्याचा 'रिलिजन' हा सर्वमान्य अर्थ अपेक्षित नसल्याने मी धर्म या शब्दाचा वापर शक्यतो टाळला आहे.
 १.११ या साऱ्या गोष्टी बुद्धिगम्य पातळीवर समजून घेऊन, स्वतःच्या अनुभवांच्या व चिंतनाच्या मुशीत ओतून, मी हे सारे राजापुरी रोकडेपणाने लिहिले आहे.
 १.१२ वसंत बापटांनी म्हटल्याप्रमाणे, 'वंद्य हिमाचल तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा' त्यात डोकावणार ! 'मार्साचा मज अर्थ हवा अन् फ्रॉयडाचा मज काम हवा, या असुराघरी राबवण्या परी गांधींचा मज राम हवा' हे बा.भ.बोरकरांचे वचन मला मननीय वाटते, पण शेवटी विंदा करंदीकरांचा 'मृद्गंध' या लिखाणात अपरिहार्यपणे रसरसून आहेच.

स्वानुभवाची जमिन कसाची,
बीज रुजे श्रद्धेचे त्यावर;
आणिक वाढे वृक्ष तयातुन,
फळे लटकती ज्ञानाची वर.
.....मृदगंधाच्या नजराण्याविण,
काय तुला मी दुसरे देणे,
मातीतुन मी आलो वरती,
मातीचे घेऊनिया गाणे.

 १.१३ अमेरिकन पुस्तके जेव्हा एखाद्या नवीन व्यवस्थापनतंत्राचा विचार मांडतात त्यावेळी त्यांच्या संस्कृतीचा पाया त्यात गृहीत धरत असतात. त्या लेखकांच्या आणि वाचकांच्या मनात सारे गृहीतक स्पष्ट असते. त्यातला ख्रिश्चन तत्त्वज्ञानाचा मूलाधार पक्का असतो. त्यापेक्षा वेगळ्या पायावर ज्यांचे संचित आधारलेले आहे त्या भारतीयांनी त्या संकल्पना हा नुसत्या पुस्तकांत वाचलेल्या असतात. ती त्यांची श्रद्धा नसते. साधा शपथ घेण्याचा विचार पाहा. खोटी शपथ घेण्याच्या विचाराला जो ख्रिश्चन धर्मातला पापाचा (सिन) विचार आहे तो भारतीयांच्या मनात फार थोडा असतो.
 १.१४ पूर्व न्यायमूर्ती न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी तर असे विधान केले आहे, की 'पाश्चात्य देशात आरोपीही खरे बोलतो व या तथाकथित धार्मिक देशात देवाची शपथ घेऊन शंभर टक्के खरे बोलणारा साक्षीदारच

अस्तित्वात नाही, मग तो धर्मगुरू असो, नेता-पुढारी असो. खोटे साक्षीदार,

४ सुरवंटाचे फुलपाखरू