पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचार मुळात 'वसुधैव कुटुंबकम्' म्हणून जगातल्या सर्व मानवांसाठी आहे. या विचारवंतांपैकी कुणालाही त्यांच्या प्रादेशिक भारतीय राष्ट्रीयत्वाची लाज वाटत नव्हती, पण त्यांच्या विचारविश्वाचे स्वरूप मूलतः व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासातून आंतरराष्ट्रीय किंवा वैश्विक मंगल साधण्याचे होते. त्यामुळे भारतीय पृथगात्मता त्यांत खास उल्लेखलेली नाही. वैयक्तिक मोक्षाचा विचार जास्त आहे. मी मोक्ष या कल्पनेसंबंधी फारसा विचार केलेला नाही, किंवा तशा अनुभवाचा प्रयास केलेला नाही व म्हणून काहीही लिहिलेले नाही.
 १.०८ त्या मानाने, विवेकानंद हे जास्त प्रादेशिक स्वरूपाचे, राष्ट्रीय व लौकिक आयुष्याचा विचार मांडणारे, भारतात त्या काळात रूढ असलेल्या सामाजिक गोष्टी बदलायला हव्यात असे मानणारे होते. लोकमान्य टिळकांचा गीतेचा अर्थही निष्क्रिय भारतीय समाजाला निष्काम कर्मयोगाची प्रेरणा देणारा होता; तत्कालीन 'स्वदेशा'शी प्रादेशिक अर्थाने जास्त जोडलेला होता. माझी स्वतःची मानसिक घडण गुरुपरंपरा सांगायची तर शिवाजी, विवेकानंद, टिळक, सावरकर, विनोबा अशी आहे. माझे भारतीयत्वाचे आकर्षण या राष्ट्रीय, प्रादेशिक समाजात रुजलेले आहे. त्यामुळे आधुनिकातले आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान, उत्पादनतंत्र पचवून, भारताच्या मूळ संचिताशी संबंध कायम ठेवून भारतीय व्यवस्थापनशास्त्राचा विचार करणे आवश्यक आहे असे मला ठामपणे वाटते.
 १.०९ त्यामुळे मूळ भारतीय गाभ्याला हात न लावता पण ज्या गोष्टी स्थलकालसापेक्ष आहेत त्यात संपूर्ण बदल करण्यास माझी मानसिक तयारी आहे. पाश्चात्य विचारातला लोकशाहीचा आग्रह, स्त्रीपुरुष समानता, मतस्वातंत्र्य ह्या साऱ्या गोष्टी माझ्या श्रद्धेचा विषय आहेत. माझा ध्यास कुठल्याही ग्रंथप्रामाण्यापेक्षा त्या विचारसूत्रांशी प्रामाणिक राहण्याचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विचारांइतकाच प्रत्यक्ष आचार कती मला महत्त्वाची वाटते. केवळ आध्यात्मिक अनुभूतीवर किंवा ज्ञानावर माझे समाधान होत नाही. 'यथा चित्तं तथा वाचा यथा वाचा तथा क्रियाम्' यांतले वाचा आणि क्रिया यांमधले समानत्व मान्य करूनही केवळ चित्त व वाचा यांच्या शुद्धीवर माझे समाधान होत नाही तर तदनुसार कृती हीदेखील मला तितकीच महत्त्वाची वाटते.

 १.१० त्यामुळे प्रा. चक्रवर्ती यांचे विचारऋणं मान्य करूनही, त्यांनी उघडलेल्या दारातून प्रवेश केल्यानंतर मला जे जाणवले आणि मी गेली चाळीस वर्षे जे निरनिराळ्या अंगांनी व्यवस्थापनाचे अनुभव घेतले, त्यावर आधारित हे लिखाण आहे. रामायण, महाभारत, गीता, गीतारहस्य, गीताप्रवचने, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास हे त्याचे आधार आहेत. सावरकरांचे जळजळीत, हिंदुत्ववादी

सुरवंटाचे फुलपाखरू ३