पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असाही नियम होता.
 १.०४ माणसाच्या जीवनाची सुरुवात श्वासोछ्वासाने होते व शेवटही त्यानेच होतो. म्हणून श्वासोछ्वासावर नियंत्रण ही पहिली पायरी. दीर्घश्वासाचा सराव करायचा. मग श्वासावर लक्ष केंद्रित करत करत, मनाचे अचपळपण आवरत हृदयाच्या अंतरंगात लक्ष केंद्रित करायचे अशी अपेक्षा होती. भारतीय तत्त्वज्ञानात मनाच्या गूढ कप्प्यात, म्हणजेच हृदयगुहेत जे सूक्ष्म तत्त्व विद्यमान असते, त्याचा विचार करायचा ही महत्त्वाची गोष्ट मानली जाते. त्याच आत्मतत्त्वाचे वैश्विक सत्याशी असलेले नाते लक्षात घेऊन माणसामाणसांमधले संघर्ष, मानसिक ताण टाळण्याचे उपाय आणि यशस्विता व त्यातून . उद्योगव्यवस्थापनाचा भारतीय पायावरील विचार हे कार्यशाळेचे सूत्र होते.
 १.०५ अमेरिकन व्यवस्थापन तंत्रातल्या 'मोटिवेशन', 'वर्क एथिक', 'मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिज', 'ट्रॅन्झंक्शनल अॅनॅलिसिस' यासारखी व्यवस्थापन तंत्रे (मॅनेजमेंट टेक्निक्स), जपानी पद्धतीची मॅनेजमेंट, धंद्यातल्या यशाच्या मोजमापाच्या पद्धती, 'गोल्स', 'सुपरऑर्डिनेट गोल्स' अशा साऱ्या संकल्पनांशी अभ्यासकांचा पूर्वपरिचय कार्यशाळेत गृहीत धरलेला होता. त्यामुळे भारतीय पायावर आधुनिक कल्पनांची सांगड घालणे आणि त्यातले मुळातले फरक लक्षात घेणे हे कार्यशाळेचे प्रमुख काम होते.
 १.०६ थोडक्यात म्हणजे इंग्लिशमधून शिकलेल्या, इंग्लिशमधून आधुनिक तंत्रज्ञान ग्रहण केलेल्या भारतीय व्यवस्थापकांना त्यांच्या मूळ भारतीय नाळेच्या नात्याचा प्रायोगिक अनुभव आणि बुद्धिवादावर आधारलेली ओळख करून देणे हा कार्यशाळेचा हेतू होता. पायाभूत ग्रंथ अर्थातच रवीन्द्रनाथ, विवेकानंद, अरविंद, व गांधी या पश्चिमेची विद्या पचवून स्वदेशी मुळांकडे परतलेल्या महान भारतीयांचे होते. त्यातला आध्यात्मिक अनुभूतीसंबंधीचा भाग रामकृष्ण परमहंस यांच्या अनभवजन्य गढ साक्षात्कारासंबंधी होता. मी या आध्यात्मिक अनुभूतीसंबंधी लिहिणार नाही. कारण त्यातली माझी साधना अगदी तोकडी आहे. त्यातला फक्त बुद्धिगम्य भाग मी माझ्या शब्दांत भारतीय व्यवस्थापनासंबंधीच्या माझ्या कल्पनांच्या संदर्भात मांडणार आहे.

 १.०७ रामकृष्ण परमहंस, अरविंद व रवींद्रनाथ यांच्या बऱ्याचशा कल्पना विश्वमानवाच्या संदर्भातल्या आहेत. म्हणजेच, खास हिंदुस्थानी माणसांचा विचार असा वेगळेपणा त्यात दाखवता येणार नाही. त्या महामानवांच्या विचारांचा मूळस्रोत भारतीय अध्यात्मात खोलवर रुजलेला असला तरी त्यांच्या विचारांत देशविशिष्ट अशा अर्थाने भारत-राष्ट्रीय भाग कमी आहे. अध्यात्मातला भारतीय

२ सुरवंटाचे फुलपाखरू