पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कामगारांच्या वतीने करते व त्या गुंतवणुकीवर व्याज मिळवून निवृत्तीच्या वेळी घसघशीत रक्कम एकरकमी हातात मिळण्याची व्यवस्था करते.माझ्यासारख्या अकाऊंट्स शिकलेल्या लोकांना तर सरकारी प्रॉव्हिडंट फंड,सुपरअॅन्युएन फंड,ग्रॅच्युइटी फंडापेक्षा आपण स्वतःच गुंतवणूक केली तर नक्कीच जास्त व्याज मिळवून ह्या रकमा वाढवू असे वाटत असे.एकाददुसऱ्या माणसाला ते साधतेही,पण सर्वसामान्य नियम असा की कटकटीचे हे काम करणे सर्वांना जमत नाही.म्हणून तर लोक म्युच्युअल फंडात त्यांच्या फंडाची रक्कम गुंतवतात.जास्त व्याजाच्या लोभाने खंक होणारेही कमी नाहीत.सर्वसामान्य माणसाच्या हातात आलेला पैसा लगेच खर्च होऊन जातो.त्याला अशी सक्तीची गुंतवणूक करायला लावणे हे सामाजिकदृष्ट्या आवश्यक असते.कामगारांच्याही ते हिताचे असते.बोनस हे डिफर्ड वेज म्हणून एकरकमी वर्षातून एकदा त्याच्या हातात घसघशीतपणे रक्कम पडणे ही त्याची गरज असते.ती गरज दरमहा पगारातून ते पैसे देऊन भागणार नाही.
 १७.०५ एकदा हा विचार मनात रुजला की पगाराची घासाघीस प्रचंड,पण बोनस देताना सढळ हात सोडणारा मालक कामगारांना जास्त का आवडतो हे समजायला सोपे होते.या सामाजिक वास्तवाचे भान ठेवल्यावर मग पगाराचे करार,बोनसचे करार करण्याचा मार्ग सुलभ होतो.माझ्यासारखे अनेकजण हे अनुभवाने शिकतात पण अजूनही तत्त्वपातळीवर यास मान्यता नाही.हे सूत्र, हे जमिनीवरच्या वास्तवाचे भान महत्त्वाचे होते.करार उशिरा झाला तरी त्याबद्दल तक्रार नसते पण एकरकमी मिळणारी थकबाकी पूर्वलक्ष्यी प्रभावाने मोठी रक्कम मिळण्याचे महत्त्व कामगारांना,त्यांच्या पुढाऱ्यांच्या आणि मालकांच्या सोयीचे वाटते व होते.त्याचा बोध होणे मग सोपे होते.
 १७.०६ आदर्शवादी किंवा पुस्तकी दृष्टीने हे पटणारे नाही.मलाही ते पटत नसे. पण हळहळू हे शिकायला मिळाले व शिकावे लागले.शिक्षणाने,पुस्तकातल्या गृहीत प्रमेयांनी व तयार तात्त्विक उत्तरे काढण्याच्या सवयीने आपण व्यवहारात का अडखळतो ते ध्यानात येऊ लागले.दर महिन्याला द्यायची उचल आणि गौरीगणपती व होळीच्या वेळी जादा उचल का द्यायची याचे महत्त्व समजू लागले व सोपे झाले.ज्या समाजात मी जगतो व वावरतो त्याचे धागेदोरे माझ्या व्यवस्थापकीय वर्तनात व वागणुकीत दिसू लागले.या साऱ्या गोष्टींचा अंतर्गत संबंध स्पष्ट झाला.वरवर खुळ्या व अतार्किक वाटणाऱ्या गोष्टीचे वेगळे,स्वयंभू तर्कशास्त्र लक्षात आले.

 १७.०७ माझ्या व्यवस्थापकीय घडणीत एडवर्ड डी बोनो या लेखकाच्या

१०४ सुरवंटाचे फुलपाखरू