पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्हे.शब्दप्रामाण्य हे तर मोठे शस्त्र आहे.माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की जो शब्दांसाठी स्वजातीयांची हत्या करायला मागेपुढे पाहत नाही.ऑर्थर कोस्लरने म्हटले आहे,की शब्दांशिवाय काव्य जन्माला येऊ शकत नाही आणि युद्धेही!शब्दांचा अर्थ बदलण्याची किंवा त्यांत नित्य नवा अर्थ भरण्याची भारतीय पद्धत त्यांतल्या त्यात खूप अहिंसक आहे.
 १७.०२ बोनस निवाड्यातच स्पष्टपणे असे मान्य केले गेले,की बोनस हे डिफर्ड केज म्हणजेच पुढे ढकललेला पगार आहे; नफ्याचा भाग नव्हे.म्हणून धंद्यात नफा होवो वा न होवो,तो पगार म्हणून देण्याची जबाबदारी मालकांवर आहे.तो जर पगारच आहे तर तो देणे पुढे का ढकलायचे?जेव्हाचे काम तेव्हा व्हायला हवे हे जर खरे तर जेव्हाचा पगार तेव्हा का नको?किंबहुना त्यावेळी ख्यातनाम उद्योगपती नवल टाटा यांनी तर अशी सूचना केली होती,की बोनस हे डिफर्ड वेज आहे ना मग ते सरळ महिन्याच्या पगारात मिळवून बोनस हा भांडणाचा प्रश्न कायमचा मिटवून टाका.त्यांतला डिफर्डपणा काढून टाका.ते वेजमध्येच मिळवा.मग बोनस,बोनसचे लढे,त्यासाठी संप ह्या सगळ्या भानगडी कायमच्या संपवून टाका.जे झगडे व्हायचे ते वेजवरच होऊ देत,बोनससाठी दरवर्षीचे वेगळे झगडे टळतील.
 १७.०३ कुठल्याही अर्थशास्त्र्याच्या दृष्टीने किंवा हिशेबनिसाच्या दृष्टीने नवल टाटांचा तोडगा बिनतोड होता.मलाही तो पटायचा.तर्कशास्त्राच्या दृष्टीने तो बिनतोड तोडगा होताच,पण जमिनीवरच्या व्यवहारापासून तो दूर होता.हे समजायला मला वेळ लागला.

 १७.०४ मी बोनसवरच्या एका परिसंवादात भारतीय मजदूर संघाच्या गजाननराव गोखल्यांना मला बिनतोड वाटणारा प्रश्न विचारला.त्यांनी मला जमिनीवर आणले.ते म्हणाले,की आपल्याकडच्या सर्वसामान्य कामगाराला पगारातून महिन्याच्या महिन्याला पैसे शिल्लक टाकून वार्षिक खर्चासाठी तरतूद करून ठेवायची सवय नाही आणि बहुसंख्यांना ते जमतही नाही.पगाराचे जे पैसे हातात येतात ते सर्व लगेच खर्च होऊन जातात.मग गणपतीच्या वेळी,दिवाळीला,होळीला,सणासुदीला एकरकमी रक्कम मुलांना आणि स्वतःला कपडे शिवायला,भांडीकुंडी घ्यायला लागते,ती कोठून आणणार?ती कोण देणार? गणिती पद्धतीने विचार केला तर ही वेगळी शिल्लक दरमहा वेगळी ठेवायला काहीच हरकत नाही,पण व्यवहारात ते तसे जमत नाही.प्रॉव्हिडंट फंड सरकारजमा का केला जातो तर ती सक्तीची गुंतवणूक दरमहा करणे,ते पैसे वेगळे गुंतवणे हे सर्वसामान्य कामगाराला जमत नाही.सरकार ते काम

सुरवंटाचे फुलपाखरू १०३