पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बनवलेले पण खाण्याची जागा वेगवेगळी झाली.पुढे तर सहा-सात उच्च अधिकाऱ्यांसाठी वेगळे अन्न शिजवून वेगळ्या पद्धतीचे पदार्थ हा प्रकार सुरू झाला.तोपर्यंत माझा मानव-संसाधनखात्याशी संबंध संपला होता.
 १६.१० काही सामाजिक सत्ये माझ्या प्रत्ययास आली.व्यवस्थापनाच्या भिन्नभिन्न पातळीवरची माणसे स्वतःचा वेग वेगळा वर्ग मानत नसली तरी त्यांच्यामध्ये आपली 'जात' वरची आहे ही भावना असल्याचा सूक्ष्म भास मला झालेला आहे.कामगार म्हणजे 'शूद्र',आपण वेगळे असा संकेत त्यांच्या मनात आढळला.ही गोष्ट 'युनिकेम'च्याच नव्हे तर अन्य कंपन्यांच्या व्यवस्थापकांशी बोलताना मला आढळलेली आहे.कॅटिनमध्ये समान हॉलमध्ये बसण्याबद्दल नाखुशी असल्यामुळे वेगळ्या पंगतीचा आग्रह असावा.हे सारे जण शिक्षित,बुद्धिजीवी,कार्यक्षम लोक होते.पण लेबर किंवा कामगार ही वेगळी जात असा प्रवाह त्यांच्या मनात मला आढळला.मॅनेजिंग डायरेक्टरांनी समानतेच्या पातळीवर मला बोलण्याची संधी द्यायला हवी,माझे म्हणणे समजून घ्यावे,अधिकाराचा वापर करून निर्णय लादू नयेत हे या साऱ्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांचे मत होते.त्यांच्या वरिष्ठांकडून ते तशी अपेक्षा करत होते.अमेरिकन मॅनेजमेंटच्या पुस्तकातली विचारसरणी 'थियरी वाय'ची गोष्ट त्यांना अगदी स्वाभाविक व आवश्यक वाटत होती,पण तोच न्याय त्यांच्या हाताखालच्या लोकांसाठी वापरायला त्यांची तयारी नसते.विनोदाने सांगायचे तर ते खरे 'मुकादम' असतात.म्हणजे वरिष्ठांच्या पदकमलांचा 'मुका' घ्यायची तयारी असणारे आणि हाताखालच्या लोकांना 'दम' देणारे मुकादम.
 १६.११ मी ही पंक्तिप्रपंचाची भावना सगळ्या कंपन्यांतून पाहिली आहे.मॅनेजर्सची,आपल्यासाठी वेगळी कँटिन्स,वेगळी स्वच्छतागृहे,अधिकाराच्या श्रेणीप्रमाणे जेवणाची सोय असावी अशी अपेक्षा असते.कंपनीतल्या सर्वांना चांगले अन्न मिळावे,सर्वांची स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत असा आग्रह नसतो.माझी पंगत वेगळी-सोवळ्याची असावी असा आग्रह असतो.हेही भारतीय वास्तव आहे आणि ते बदलण्याची आवश्यकता आहे.
 १६.१२ वर्गकल्पनेचा भारतीय जन्मजात जातिव्यवस्थेशी झालेला संकर भयानक आहे.पौर्वात्य व पाश्चात्य पद्धतीतल्या त्याज्य भागांचे हे मिश्रण भयानक आहे.भयानक असले तरी ते वास्तव आहे.तो डोंगर ओलांडायला खूप कठीण आहे म्हणून कोणी त्या दिशेने जरासाही प्रयत्न केला तरी त्याचे मला कौतुक वाटते.

 १६.१४ 'युनिकेम'च्या शेजारी एक्सेल इंडस्ट्रीज हा कारखाना जोगेश्वरीत

१०० सुरवंटाचे फुलपाखरू