पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याचे आंकडेही प्रसिद्ध करण्यात येतात.चांगले भोजन,निवासव्यवस्था,चांगली आंथरुणपांघरुणे,स्वच्छतागृहे यांसारख्या लोकांच्या गरजेच्या गोष्टी किंवा 'क्रीचर कंफर्टस' यांनी संमेलनाचे तीनचतुर्थांश यश नक्की होते असे म्हणतात ते उगीच नव्हे.बाकी कार्यक्रम तोंडी लावण्याच्या पातळीवर लोकांच्या लक्षात राहतात.केवळ साहित्यसंमेलने नव्हे तर वैज्ञानिक परिषदा,परिसंवाद यांतही भोजनाचा मुद्दा महत्त्वाचा बनतो.संयोजकांचे आभार त्यावर ठरतात.ज्यांना ज्यांना अशा आयोजनांचा अनुभव आहे त्या सर्वांचे,मला या विषयावर एकमत आढळले आहे.
 १६.०८ मी अनेक आत्मचरित्रे वाचली आहेत.त्यातही ते लेखक त्यांच्या उतारवयात,बराच कालावधी लोटून गेल्यानंतरही,आठवणीने त्यांच्या आयुष्यात,विशेषतः प्रतिकूल परिस्थितीत मिळालेल्या चांगल्या अन्नाची नोंद करत असतात.माझ्याकडे महत्त्वाची चर्चा करायला आलेले लोक माझ्या घराची आठवण माझ्या बायकोने केलेल्या रुचकर खाद्यपदार्थांवरून काढतात.मी केलेली चर्चा कोणाच्या खिसगणतीतही नसते ! 'अन्नं बहु कुर्वीत' हे वैदिक वचनही या सनातन अनुभवावर आधारलेले असावे.सारांश,औद्योगिक व्यवस्थापनातले कँटिनचे महत्त्व मी असे शिकलो.आपल्या मनात माहिती म्हणून अनेक गोष्टी जमा झालेल्या असतात.त्याची सूत्रबद्ध जुळणी जेव्हा मनात होते तेव्हाच त्याला ज्ञान म्हणता येते.आईच्या जेवुनखाऊनच्या पयांपासून युनिकेमच्या कँटिनपर्यंत माझा मानसिक प्रवास हा असा झाला.तिथे सर्वांसाठी एकाच रसोईघरात एकत्र शिजवलेले भात,पुऱ्या,भाजी,आमटी हे पदार्थ सर्व कर्मचाऱ्यांसाठी सारखे सुरू केले.

 १६.०९ जोगेश्वरीतल्या कारखान्यातल्या कॅटिनमध्ये जेव्हा सुधारणा केल्या त्यावेळी सर्वांना एकाच प्रकारचे अन्न शिजवले जावे ही माझी भूमिका होती.व्यवस्थापनातल्या माझ्या सहकाऱ्यांना सर्वांनी (कामगार व अधिकारी) एका जागेत एकत्र जेवणे ही कल्पना साफ नापसंत होती.त्यांचा विरोध टाळणे अशक्य होते.आमच्या मॅनेजिंग डायरेक्टरांना समानता हे माझे खूळ वाटत होते,तरी त्यांनी ते चालवून घेतले.पैसे खर्च करायला आडकाठी आणली नाही.त्यांनी स्वतःच्या वापरासाठी वेगळे स्वच्छतागृह बनवून सुरुवात केलीच होती.म्हणून जोगेश्वरीच्या कारखान्यातल्या कँटिनमध्ये अधिकारी वर्गासाठी तेच जेवणाचहा पण वेगळ्या खोलीत बसून खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागली.लहानपणी गावात जातीप्रमाणे पंगती पाहिल्या होत्या,त्यांची सहज आठवण होणे अपरिहार्य होते.अन्नपदार्थ एकाच ठिकाणी व एकाच स्वयंपाकघरात

सुरवंटाचे फुलपाखरू ९९