पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होता.कांतिभाई श्रॉफ हे त्याचे कार्यकारी संचालक होते.ते त्यांच्या कामगारांबरोबरच जेवत.स्वतः थाळी उचलून घेत व उष्टी थाळी परत नियोजित जागी ठेवत.अर्ध्या चड्डीवर कारखान्यात फिरत,मॅनेजर्सना वातानुकूलित नवीन इमारतीत बसवत.स्वतः मात्र त्यांचे काम अक्षरशः जुन्या गोठाच्या छपराखाली झाडापेडांच्यामध्ये,उघड्या सावलीत बसून करत.प्रदूषण निवारणासाठी झाडे लावून हमरस्त्यापासून केवळ तीस फुटांवर बसत.त्यांच्या कंपाउंडच्या बाहेर अनधिकृत सार्वजनिक मुतारी होती.त्यांच्या झाडापेडांच्या पडद्याने त्यांच्या टेबलापाशी जराही घाण येत नसे.त्यांच्या कारखान्यातल्या परिसरातल्या हवेत प्रदूषण नाही हे स्पष्ट करणारी पिंपळाची कोवळी पाने कारखान्याविषयी खूप काही सांगून जात.कांतिभाई हे अजब रसायन आहे.माझ्या अनेक गुरूंतले ते एक असल्याने त्यांची कीर्ती सांगणे आत्मप्रौढीचे ठरेल,पण त्याची पृथगात्मता जाणवण्यासारखी आहे.ते आर्थिक तराजूत भारंभार यशस्वी व कामगार- मालक संबंधातला आदर्श आहेत.अर्थात तो माझा परोक्ष अनुभव आहे.पण संपूर्ण पाश्चिमात्य व्यवस्थापन तंत्रातल्या सर्व अद्ययावत कल्पना पचवून संपूर्ण भारतीय राहिलेले ते एक श्रेष्ठ व्यवस्थापक आहेत एवढे मात्र सर्वमान्य आहे.
 १६.१५ 'युनिकेम'च्या गाझियाबाद येथल्या कारखान्यात कँटिनव्यवस्था जुनीच आहे.मी तेथे बदल करू शकलो नाही.त्यासाठी पैसे उपलब्ध करणे माझ्या हातात होते.ते मी केले पण त्याची अंमलबजावणी स्थानिक मॅनेजरच्या हाती होती.अजूनतरी कोठल्याही प्रकारची गुणवत्ता असलेले कँटिन 'युनिकेम'च्या गाझियाबाद कारखान्यात आहे की काय याबद्दल मला शंका आहे.मी हे माझे अपयश समजतो.

 १६.१६ जो स्थानिक व्यवस्थापक असतो त्याच्या मूल्यव्यवस्थेच्या कल्पनांवरच अंमलबजावणी अवलंबून असते.कंपनी भारतीय असो,अमेरिकन असो,तिच्या व्यवस्थापनाविषयीच्या धोरणांचे रूप कोणीतरी माणसेच ठरवतात,कारण अंमलबजावणीत त्यांच्याच मूल्यांचा विचार कृतीत दिसून येतो.अवकाश एकच असला तरी घटाघटाप्रमाणे त्याचा आकार वेगळा दिसतो हे तर आध्यात्मिक सत्य सांगितले गेलेले आहेच.

सुरवंटाचे फुलपाखरू १०१