पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वच्छ व सकस अन्न, जेवायला-बसायला चांगली जागा एवढीच होती. माझ्या दृष्टीने त्यांच्या पगाराची रुपयांतली किंमत फक्त मला दिसत होती. हा माझा दृष्टिदोष होता. कामगारांच्या दृष्टीने चांगल्या कँटिनचे महत्त्व पैशांपेक्षा वेगळे व स्वयंभू होते. कितीही पैसे दिले तरी प्रत्येक कामगाराला कँटिनइतके चांगले अन्न घरून आणणे शक्य नव्हते.
 १६.०६ माझ्या मामांना न मिळणारे पण आईला सहज मिळणारे पयरे,ओबेरायच्या जेवणाच्या वेळी मोठमोठे वरिष्ठ व्यवस्थापक अनावर का तुटून पडले,टाटा-मफतलाल मधले वरिष्ठ अधिकारी मित्र मोठ्या हॉटेल्समधल्या लंचकूपन्सची आठवण व कौतुक का करत,या सर्वातला समान धागा माझ्या लक्षात आला.माझा कॅटिनच्या प्रश्नाबद्दलचा रोख बदलला.मी सहा महिन्यांच्या आत 'युनिकेम'च्या जोगेश्वरीतल्या कारखान्यातले कँटिन तिथली यंत्रसामग्री,भांडी,फर्निचर,बसण्याची व्यवस्था बदलून,टाकले.विक्रीच्या प्रमाणावर सब्सिडीची नवी पद्धत सुरू करून कंत्राटदाराकडून मिळणाऱ्या पदार्थांच्या दर्जाची सोय लावून टाकली.कारण अन्न चवदार असल्याशिवाय कोणी खात नाही.विक्री जास्त तर सब्सिडी अनेक पर्टीनी जास्त करून कंत्राटदाराला त्याचे आकर्षण निर्माण केले.औषधांचे दर्जा नियंत्रण उपकरणातून तपासता व राखता येते.अन्नाची चव तपासण्याची यंत्रणा उपलब्ध नाही.खाणाऱ्यांचा प्रतिसाद हा एक निकष असू शकतो.बटाटावड्याचा आकार तपासता येतो,चव तपासणे शक्य नसते.माणसाला जो पदार्थ चवीला आवडतो तोच तो खातो,कोणी बेचव पदार्थ खात नाही.मी कँटिनची सब्सिडी माणसांच्या संख्येवर किंवा महिन्यांवर न ठरवता विक्री झालेल्या कूपन्सच्या प्रमाणात ठरवून तो प्रश्न मार्गी लावला.'युनिकेम'चे कँटिन हे त्या परिसरातले उत्तम कँटिन बनवले.ह्या साऱ्याच्या मागे मनातला चौकटीतला बदल हा महत्त्वाचा होता असे मला वाटते.माझ्या मनाची चौकट बदलली हा माझ्या शिक्षणाचा भाग होता.

 १६.०७ मित्रांशी चर्चा करताना मुद्दा अधिक स्पष्ट झाला.त्यानंतर कोठल्याही अधिवेशनात, लग्नकार्यात केटरर्स त्या कार्यक्रमांचे यशापयश ठरवतात हे स्पष्ट झाले.'मिष्टान्नं इतरेजनाः' हे लग्नकार्यात लक्षात ठेवले जातेच.अधिवेशनातले वक्ते.त्यांची भाषणे.मिळणारी माहिती चर्चा यांच्याबद्दल जेवढे बोलले जाते,त्यापेक्षा जास्त चर्चा तिथे मिळालेल्या जेवणाबद्दल असते.चांगल्या जेवणाची चर्चा जास्त होते.मराठी साहित्य संमेलनात तर साहित्यविषयक चर्चेपेक्षा राहण्याजेवणाच्या व्यवस्थेबद्दल वर्तमानपत्रांत जास्त लिहून येते.संमेलनांत किती क्विंटल भाज्या,फळे,दूध,मटण आणले गेले

९८ सुरवंटाचे फुलपाखरू