पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जेवायचे की घरून डबा आणायचा हे कामगारांनी स्वतःचे स्वतः ठरवावे.कँटिनसाठी जागा,भांडी,वीज,पाणी हे सारे कंपनी देईल,पण प्रत्यक्ष अन्नाची किंवा खाद्यवस्तूंची किंमत कामगारांनी स्वतःच्या खिशातून बाजारभावाने भरली पाहिजे.त्यात कुठलेही अनुदान नसावे.
 १६.०३ अन्न,वस्त्र व निवारा ह्या प्रत्येक माणसाच्या प्राथमिक गरजा असतात.मीही हा पाढा पाठ केलेला होता,पण त्याचे सारे श्लेष मला उलगडलेले नव्हते.पहिला धक्का,मला दिल्लीला झालेल्या एका कंपनी सेक्रेटरीज व फायनॅन्शीयल मॅनेजर्सच्या संमेलनात मिळाला.आम्ही सगळे ओबेरॉय या मोठ्या शाही हॉटेलात जमलो होतो.सगळेजण माझ्यासारखे मोठ्या आर्थिक पदांवरचे लोक होते.बऱ्याच जणांना माझ्यासारखी सक्त आहारनियमनाची आरोग्यदृष्टया गरज स्पष्ट दिसत होती.सारे वजनदार दिसत होते.पहिलेच सत्र जरा बऱ्यापैकी लांबले.आलेले सर्व प्रतिनिधी भुकेले असण्याची काही शक्यता नव्हती. लांबलेले सत्र संपले आणि आमचा सर्वांचा मोर्चा जेवणाच्या प्रशस्त दिवाणखान्याकडे वळला.समोर,त्या आलीशान हॉटेलच्या लोकांनी फार मोठ्या लांबलचक टेबलांवर नाना प्रकारचे चवदार,सुवासिक खाद्यपदार्थ ताजे ताजे व आकर्षक पद्धतीने मांडलेले होते त्याचा घमघमाट सुटलेला होता.त्या दिवाणखान्यात जाताच आमच्याबरोबरच्या सर्व लोकांनी.ज्या पद्धतीने त्या अन्नावर जसा तुटून पडून ताव मारला तो मला तरी एक अविस्मरणीय अनुभव होता.तो सारा प्रकारच अन्नाच्या प्राथमिकतेचा वस्तुपाठ होता.काही मिनिटांतच, सारी टेबले रिकामी झाली आणि त्यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी जो गोंधळ घातला व धक्काबुक्की केली तो प्रसंग अविस्मरणीय होता.त्यानंतरही त्याच प्रकारचे अनुभव अनेक अधिवेशनांत आले.
 १६.०४ माझे अनेक मित्र टाटा,मफतलाल अशासारख्या ख्यातनाम कंपन्यांत वरिष्ठ पदावर काम करत होते.त्यांच्या बोलण्यात त्यांना कंपनीच्या खर्चाने मोठमोठ्या हॉटेलांमध्ये दुपारचे जेवण मिळण्याची सोय असते ह्याचा आवर्जून उल्लेख असायचा.त्यासाठीच्या लंचकूपन्सचा गौरव त्यांच्या बोलण्यात असायचा,माझ्या मनात हळुहळू चांगल्या अन्नाचे पैशापेक्षा जास्त असलेले वेगळे व स्वयंभू महत्त्व ध्यानात आले.चांगले अन्न मिळणे व जास्त पैसे मिळणे यांत लोकांची पसंती चांगल्या अन्नाकडे जास्त असते हे माझ्या मनात ठसले.

 १६.०५ 'युनिकेम'चे कामगार ताज,ओबेराय यांच्यासारख्या जेवणाची अपेक्षा त्यांच्या कैंटिनमध्ये करत नव्हते.मी माझा सारा विचार त्या अन्नाचा खर्च रुपयांत किती होतो एवढ्यापुरता करत होतो.कामगारांची अपेक्षा चांगले,

सुरवंटाचे फुलपाखरू ९७