पान:सुखाचा शोध.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण अकरावें. दिवसांनीं तो तिच्याकडे एकदां कोणत्या तरी निमित्यानें जाऊन येत असे. मालतीनें कांहीं कविता केल्या होत्या. त्या अर्थातच दिनकरला फार आव- इल्यामुळे त्यानें त्या तिच्याजवळून मागून घेतल्या आणि कोठल्या तरी मासिक पुस्तकांत प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न चालविला. 'राष्ट्रदीप' नांवा- च्या मासिक पुस्तकाच्या संपादकाने त्या कविता प्रसिद्ध करण्याचें कबूल करून त्या आपल्या जवळ ठेवून घेतल्या. कविता प्रसिद्ध होतांच तो अंक घेऊन मालतीकडे जावयाचें, असे दिनकरनें मनांत मांडे खाण्यास आरंभ केला होता; पण संपादक कसले खमंग ! त्यांनी त्या महिन्याच्या अंकांत कविताच प्रसिद्ध केल्या नाहींत. दिनकरला त्या संपादकाचा असा राग आला; पण काय करणार? संपादकानें जागेची अडचण दर्शवून दिलगिरी दाखविल्यामुळे दिनकरचा अगदी नाइलाज झाला. राष्ट्रदीपाच्या पुढच्या अंकांत मात्र त्या कविता प्रसिद्ध झाल्या आणि परभारें छापखान्यांतूनच चार आण्यांना तो गरमागरम अंक बरोबर घेऊन दिनकर मालतीच्या घरीं येऊन दाखल झाला. दिनकर वामनरावांच्या बंगल्याच्या दरवाजाजवळ जातो, तोंच त्याला अपशकुन झाला. दरवाजासमोरच एका घोड्याची सुरेख विलायती गाडी उभी असलेली पाहून दिनकरच्या हृदयांत धस्स झाले आणि आंत मुकुंद तर नाहीं ? अशी त्याला शंका आली. असेना मुकुंद असला तर आंत ! त्यामुळे दिनकरच्या पोटांत एवढे धस्स होण्याचें कांहीं कारण नव्हतें; पण मालतीच्या बाबतीत दिनकरची मनःस्थिति हळू हळू इतकी नाजुक होत चालली होती की, त्याला असला धक्का सहन होईनासा झाला होता. ती गाडी पाहतांच दिनकरचा अर्धा अधिक उत्साह नाहींसा होऊन मंद पावलें टाकीत त्यानें बंगल्यांत प्रवेश केला. मुख्य दिवाणखान्यांत कोणीहि नव्हते. चतुष्पाद खुर्च्या वगैरे आसनें मौन स्वीकारून स्वस्थ उभीं होतीं. दिनकर तसाच आणखी पुढे गेल्यावर त्याला एका खोलीत काळ्या रंगाचा साहेबी पोषाख केलेला एक तरुण पियानो वाजवीत असलेला दिसला. मालती त्या तरुणाच्या जवळच एका खुर्चीवर बसलेली असून ती गात होती. हा देखावा दिनकरच्या दृष्टीस स्पष्ट पडला आणि तो थोडा वेळ त्या दोघां-