पान:सिंचननोंदी.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मराठवाडा परिवाराचा व श्री. पन्नालालजी सुराणांचा मी अत्यंत ऋणी आहे.
 'सिंचननोंदी' लिहून मी एकप्रकारे 'बाजूच' घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात 'शेती व पाणी क्षेत्रात विविधप्रकारे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या अनेक मान्यवरांशी वेगळ्या पातळीवर संबंध आला. पाणलोटक्षेत्र विकासाचा एक आदर्श आडगावला निर्माण करणारे कृषिभूषण श्री. विजयअण्णा बोराडे व बॅ. गांधी, खेड्यांतील गरिबांच्या झुंजीतून बळिराजा धरण उभे करणारे डॉ. भारत पाटणकर व कॉ. संपतराव पवार, सिंचन व्यवस्थापनात · शेतकरी सहभागाचा एक वेगळा प्रयोग करणाऱ्या कासाडचे श्री. रा. के. पाटील व श्री. श्री. ना. लेले, लोकअभियंता श्री. के. आर. दात्ये, 'महाराष्ट्रातील दुष्काळ' या पुस्तकाचे लेखक व पुण्याच्या अॅकॅडमी ऑफ पोलिटिकल अँड सोशल स्टडीजचे एक पूर्ण वेळ कार्यकर्ते श्री. दत्ता देसाई आणि राज्य नियोजन मंडळावरील आपल्या पदाचा उपयोग शेती व पाणी क्षेत्रातील आपली तात्विक भूमिका जाणीवपूर्वक पुढे रेटण्यासाठी प्रयत्न करणारे प्रा. एच्. एम्. देसरडा या सर्वांशी केवळ अर्थपूर्ण चर्चाच झाल्या नाहीत तर या सर्वांनी अत्यंत आपलेपणाने सर्वतोपरी मदत केली.
 राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री. अण्णासाहेब शिंदे यांनी तब्येत बरी नसताना आणि कामात व्यग्र असतानादेखील प्रस्तावना लिहून दिली. आपल्या पहिल्याच प्रयत्नाचे अण्णासाहेबांसारख्या शेती व पाणी विषयातल्या ज्येष्ठ व श्रेष्ठ तज्ज्ञांकडून कौतुक व्हावे हे मी माझे माग्यच समजतो. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी प्रस्तावनेत व्यक्त केलेल्या अपेक्षा पुन्य करायला मला बळ प्राप्त होईल अशी माझी खात्री आहे. मा. श्री. अण्णासाहेबांचा. मी ऋणी आहे...
 एस्. एम्. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनने 'सिंचननोंदी' प्रकाशित केल्याबद्दल मी फाउंडेशनचा वसा. श्री. नानासाहेब गोरेंचा अत्यंत आभारी आहे.
 वाल्मी व वाल्मीतील सर्व प्राध्यापकवर्गाने मला दिलेल्या ज्ञानामुळेच मी 'सिंचननोंदी' लिहू शकलो. 'सिंचननोंदी' सर्वार्थाने वाल्मीच्याच आहेत. तेव्हा हे पुस्तक वाल्मीला अर्पण करताना आज मला गुरुदक्षिणाच दिल्यासारखे वाटत आहे. वाल्मीचे संस्थापक संचालक श्री. ह. वा. ढमढेरे, प्रा. डॉ. सु. भि. वराडे, प्रा. म. मो. पटवर्धन, प्रा. मो. म. दांडेकर, प्रा. प्रा. वि. स. पाध्ये, प्रा. डॉ. श. शे. भालेराव, प्रा. अ. रा. सूर्यवंशी व प्रा. डॉ. श. गं. भोगले या सर्वांनी मला नेहमीच मदत केली. त्यांचा व वाल्मीचा मी अत्यंत ऋणी आहे.
 'सिंचननोंदी लिहिण्याचे काय संभाव्य परिणाम होऊ शकतात याची कल्पना असूनही तू लिही. हे सर्व कोणी तरी करायलाच हवे' असे म्हणणाऱ्या विद्याचे आभार मानलेले तिला आवडायचे नाही. पण तिच्या आधाराविना 'सिंचननोंदी भी लिहूच शकलो नसतो याची नोंद मात्र होणे आवश्यक आहे.

औरंगाबाद

-प्रदीप पुरंदरे

१५ जुलै १९९२