पान:सिंचननोंदी.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अहवाल तयार करण्याच्या काळात पुण्याला गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या वसतिगृहात राहिलो. वातावरणातला बदल लक्षणीय वाटला. थोडेफार वाचन केले. नेहमीच्या वर्तुळाबाहेरील इतरेजनांशी चर्चा झाल्या. या वर्षभरात आपल्या सिंचनाचे जणू मिनी 'विश्वरूप' दर्शनंच झाले.
 पाटबंधारे खात्यापासून आता सर्व दृष्ट्या पूर्णपणे दुरावलो होतो. तेथून राजीनामा दिला आणि वाल्मीतच अध्यापक म्हणून लागलो. वाल्मीतील अध्यापनाच्या निमित्ताने अभ्यास करावा लागला. महाराष्ट्रातील अनेक छोट्या-मोठ्या प्रकल्पांच्या वाल्मीने केलेल्या मर्यादित मूल्यमापनात सहभागी होता आले. विविध थरांतील शेकडो प्रशिक्षणार्थी अभियंत्यांशी हितगुज करता आले. वाल्मीच्या फिल्ड प्रॉजेक्टस्मधून व शेतकरी प्रशिक्षणातून परत शेतकऱ्यांशी नाते जोडले गेले. वाल्मीच्या त्यावेळच्या मोकळ्या वातावरणात झालेल्या चर्चांमुळे अनुभवाला तांत्रिक विश्लेषणाची जोड मिळाली. पुढे अमेरिकेतल्या अत्याधुनिक सिंचन व्यवस्थापनाची झलक प्रत्यक्ष पाहता आली, रुड़की विद्यापीठातून सिंचन व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करता आले. त्या वेळी कालवा स्वयंचलितीकरण या सिंचन अभियांत्रिकीतील नवीन अत्याधुनिक विषयाची ओळख झाली.
 वाल्मीमुळे सिंचनाबाबत कळायला लागले तर रुड़कीतील कालवा स्वयंचलितीकरणाच्या अभ्यासातून एक वेगळाच दृष्टिकोन प्राप्त झाला आणि 'सिंचन नोंदी' लिहाव्याशा वाटल्या.
 आपल्या सिंचन प्रकल्पांमध्ये सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या सिंचनक्षमता लक्षणीयरीत्या खालावत आहेत, सिंचन प्रकल्पांत आज अभियांत्रिकीही नाही आणि व्यवस्थापनही नाही. आहे ते फक्त भ्रष्ट, गलथान आणि सर्व प्रकारचे स्वार्थी हितसंबंध जोपासणारे प्रशासन. त्यामुळे नियंत्रणशून्य पाणीवापर होत असून आपले सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आजारी आहेत. कालवा चालविण्याचे आणि एकंदरीतच सिंचन प्रकल्प उभारण्याचे आपले तंत्र मुळातच अत्यंत मागास, जुनाट व अवैज्ञानिक आहे. नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान लोकाभिमुख वैज्ञानिकतेच्या दृष्टिकोनातून आणले गेल्यास व शेतकरी- नियंत्रित पद्धतीने ते राबवले गेल्यास "जलसिंचनात क्रांती होऊ शकते. आजचे आणि उद्याचे आजारी सिंचनप्रकल्प कार्यक्षम बनू शकतात, अशी एकंदर भूमिका सिंचननोंदीत मांडलेली आहे.
 मागास, जुनाट अवैज्ञानिक, सरकार- नियंत्रित सिंचन प्रकल्पांकडून अत्याधुनिक, कार्यक्षम, वैज्ञानिक, शेतकरी-नियंत्रित सिंचन प्रकल्पांकडे जाणीवपूर्वक जाणे हा बदल फक्त 'व्यवस्थापनात काही सुधारणा' असा 'फालतू' बदल नाही. तर तो त्यापलीकडे जाणारा बदल आहे, अशी माझी धारणा आहे. ही धारणा चूक की बरोबर हे शेती व पाणी प्रश्नांवर तळमळीने विचार व कृती करणाऱ्या नियोजनकारांनी, अभ्यासकांनी व परिवर्तनाच्या लढ्यांत अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ठरवायचे आहे.
 'सिंचननोंदी' मी केवळ दै. 'मराठवाडा'मुळेच लिहू शकलो. 'पत्र नव्हे शस्त्र' असणाऱ्या या वृत्तपत्राच्या संपादकीय विभागातील माझ्या मित्रांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. श्री. निशिकांत भालेराव यांच्याबरोबर वेळोवेळी झालेल्या चर्चेतून दै. मराठवाडात सिंचनावर लिखाण करण्याची कल्पना प्रथम पुढे आली. श्री. राधाकृष्ण मुळींमुळे ती प्रत्यक्षात आली व लिखाणास सुरुवात झाली. 'सिंचननोंदी' पुढे श्री. जयदेव डोळेंनी सांभाळल्या. संपादक श्री. पन्नालालजी सुराणांचे मार्गदर्शन तर प्रथमपासूनच मिळाले. 'सिंचननोंदी' पुस्तकाच्या स्वरूपात छापाव्यात म्हणून त्यांनी स्वतः विशेष प्रयत्न केले. मा. श्री. अण्णासाहेब शिंदे यांची बहुमोल प्रस्तावनाही त्यांनीच मिळवून दिली.