पान:सिंचननोंदी.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्र स्ता व ना

 श्री. प्रदीप पुरंदरे यांचा 'सिंचननोंदी' हा ग्रंथ वाचनीय तर आहेच परंतु कालव्यांच्या पाण्याच्या वाटप व्यवस्थेवर अशा प्रकारचा अभ्यासात्मक त्रुटींवर प्रकाश टाकणारा आणि उपयुक्त असा आढावा आतापर्यंत माझ्या वाचनात आलेला नव्हता. श्री. प्रदीप पुरंदरे यांनी प्रस्तुतच्या ग्रंथात कालव्याच्या पाण्याच्या वापरासंबंधी अनेक बाजूंनी अभ्यास करून शासनाला व जनतेलाही उपयुक्त होईल आणि शेती उत्पादन वाढविण्यास मदत होईल अशा अनेक सूचना केलेल्या आहेत. श्री. पुरंदरे यांच्या पुस्तकाचा प्रमुख उपयोग लोकशिक्षण आणि कालव्याच्या पाणीवाटपाशी संबंधित असलेल्या समस्यांचे विश्लेषण व चर्चा घडवून आणणे हा आहे.
 महाराष्ट्रातील पाटबंधारे योजनांवर आतापर्यंत सुमारे ४ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च झालेली आहे आणि भविष्यकाळात हा आकडा ३०-४० हजार कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या नफ्या-तोट्याची अतिशय काळजीपूर्वक तपासणी करून आणि मूल्यमापन करून आवश्यक ते घोरणात्मक निर्णय राज्य पातळीवर घेण्याची गरज आहे. शेतीसाठी पाणी ही आवश्यक आणि फायद्याची बाब आहे याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. परंतु सामाजिक फायद्याचे गणित कशाही तऱ्हेने मांडले तरी सरकारी तिजोरीतून खर्च होणाऱ्या पैशाच्या नफ्या-तोट्याकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे काय ? असा प्रश्न विचारणे गैर नाही. जनतेकडून कराच्या रूपाने वसूल केलेल्या पैशांतून आपली धरणे बांधली जातात. करदात्याला त्याने कराच्या रूपाने सरकारला दिलेल्या पैशाचा योग्य उपयोग केला जातो किंवा नाही यासंबंधी विचारणा करण्याचा नैतिक अधिकारच आहे. महाराष्ट्रातील जमीन, पाणी, भौगोलिक रचना, व्यापक दुष्काळी प्रदेश, . अत्यल्प असे ओलिताखालचे क्षेत्र, हे लक्षात घेता ओलिताखाली आलेल्या क्षेत्रापासून व पाटबंधारे योजनांपासून होणाऱ्या फायद्यांचा उपयोग भविष्यकाळात ओलितापासून वंचित राहिलेल्या भागांसाठी करावा अशी मूलतः कल्पना होती. अडचणी काहीही असोत ही संकल्पनाही प्रत्यक्षात राबविता आलेली नाही.
 जनतेच्या जाणीवपूर्वक सहभागाशिवाय पाणीवाटपाचा कार्यक्रम यशस्वी होणे कदापि शक्य नाही. केवळ मंत्रालयातून सरकारी हुकूम काढून व फक्त कर्मचाऱ्यांच्या यंत्रणेवर विसंबून पाटबंधारे योजनांच्या क्षेत्रांतील पाणीवाटपाचे प्रश्न सुटतील असे मानणे म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेणेच होय.
 पाटबंधारे योजनांच्या पाण्याचे वाटप करताना जे गैरप्रकार होतात ते महात्मा जोतिबा फुलेंच्या काळापासून चालू आहेत. उलट महात्मा जोतिबा फुलेंनी यासंबंधी जी टिकाटिप्पणी केली त्यापेक्षाही आजची परिस्थिती अधिक बिघडलेली आहे. हल्ली अनेक जुन्या कालव्यांवर पिकांच्या गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या नसतात. कालव्याचे पाणी चान्या व उपचाऱ्यांच्याद्वारे देताना पाण्याचा किती अपव्यय होतो व चोऱ्या होतात आणि कालव्याच्या व्यवस्थापनात गैरप्रकार कसे वाढीस लागतात याची महात्मा फुले यांना संपूर्ण कल्पना होती. कारण त्यांनी स्वतः शेती केली होती. महात्मा फुलैच्या दूरदृष्टीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कारण पाणी खुल्या चाऱ्यांच्याद्वारे न देता शेतात तोटीने म्हणजे पाईपने द्यावे असा एकविसाव्या शतकाला सामोरे जाणाऱ्या आधुनिक विचारवंतालासुद्धा लाजवील असा क्रांतिकारक विचार त्यांनी मांडला आहे.
 महात्मा फुले यांच्या टिकाटिप्पणीवर लिहिलेले प्रकरण हे श्री. पुरंदरे यांच्या पुस्तकातील सर्वोत्कृष्ट प्रकरण आहे. सुमारे एक शतकापूर्वी महात्मा जोतिबा फुले यांनी