पान:सिंचननोंदी.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
-: लेखकाचे मनोगत:

 १९७७ साली बी. ई. (स्थापत्य) झालो. अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात जलसिंचनाबद्दल फारसे काहीच नव्हते.
 महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारेखास्यात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीला लागलो. जवळजवळ तीन वर्षे इतर अनेक अभियंत्यांसारखे फारसे महत्त्वाचे काहीही काम न करता सोलापूरला कार्यालयात चहा पीत बसून होतो. फारसे कामही नव्हते आणि जे होते ते करायला आम्ही "लायक" व साहेबांच्या मर्जीतले नव्हतो.
 या तीन वर्षांत जलसिंचनाबाबत काहीही शिकायला मिळाले नाही. उलट एकीकडे आपण अभियंते म्हणून संपत आहोत ही बोचणी तर दुसरीकडे पाटबंधारे खात्याला अभियंत्यांची खरेच गरज आहे का असा मूलभूत प्रश्न पडायला लागला.
 नैराश्य वाढत होते. साहेबांशी न पटणे हा नियम व्हायला लागला होता. १९८० साल उजाडले. एक दिवस दहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी पाठवा असे काही तरी परिपत्रक शासनाकडून आले. "पाठवून द्या किरकिर. रखडू दे दहा महिने अशा उदात्त भावनेने साहेबांनी माझे नाव प्रशिक्षणासाठी पाठवले आणि माझे तर जगच बदलून गेले ! जगण्याला अर्थ प्राप्त झाला. संदर्भ सापडला.
 औरंगाबादच्या जल व भूमी व्यवस्थापन संस्थेतील (वाल्मीतील) अत्युत्तम प्रशिक्षणामुळे जलसिंचनाबद्दल प्रथमच खरे काही तरी शिकायला मिळाले. प्रशिक्षण नके शिक्षणच होते ते! सवीन ज्ञान मिळाले. वेगळी दृष्टी मिळाली. सिंचन प्रकल्पांच्या केंद्रस्थानी 'साहेब' नाही तर शेतकरी हवा. पाणी पिकांना द्यायचे असते, जमिनीला नाही. सिंचन प्रकल्पांचे हेतू फसायचे नसतील तर केवळ स्थापत्य अभियंता म्हणून डिंग मारण्यात अर्थ नाही. अभिनिवेश सोडून बदलायला हवे. पाणी, माती, पिके, हवामान, शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक स्थिती व त्यांचे मानस या सर्वांचा अभ्यास करायला हवा. त्या त्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांचा व त्यांच्या शास्त्रांचा आदर करत त्यांच्याबरोबर काम करायला हवे. सिंचन प्रकल्पांचे प्रशासन नव्हे तर 'व्यवस्थापन' करायला हवे. एक ना दोन अनेक गोष्टी-पिकांच्या मुळाकडे जाताना सिंचनाच्या संकल्पना मुळापासून बदलणाऱ्या व मातीचे शास्त्र सांगताना आपल्या मातीशी नव्याने अर्थपूर्ण नाते जोडणाऱ्या !
 प्रशिक्षणाने आत्मविश्वास वाढला. काही करून दाखवायचे म्हणून नवीन उत्साहात प्रत्यक्ष लाभक्षेत्रात कामाला गेलो आणि वास्तवाने पुन्हा एकदा टपली मारली. 'ते प्रशिक्षण वगैरे बाजूला ठेवा. नसता शहाणपणा करायचा नाही. आम्ही सांगतो ते करायचे. नाही तर सुटा येथून पुन्हा एकदा गाठ पडली साहेब नावाच्या अडसराशी !
 मांडणे, बंद दरवाजावर दिलेल्या व्यर्थ धडका, मनःस्ताप अशा परिस्थितीत कसे बसे वर्ष काढले उजनीच्या लाभक्षेत्रात. लौकिक अर्थाने अयशस्वी ठरलो. अव्यवहारी समजला गेलो. परत वाल्मीत आलो. आता प्रतिनियुक्तीवर.
 वाल्मी त्यावेळी मुळा प्रकल्पाचे मूल्यमापन करत होती. मला तेथे पाठवण्यात आले. गोखले अर्थशास्त्र संस्थेबरोबर मुळा प्रकल्पाची सामाजिक, आर्थिक पाहणी करण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने मुळा प्रकल्पात खूप हिंडलो. टेल एंडवरील प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली. अभियंतेपण बाजूला ठेवून शेकडो शेतकन्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या गावात गेलो, घरी गेलो, त्यांच्या चारी- चारीने हिंडलो. संबंधित अधिकाऱ्यांशीही बोललो. प्रथम सहा महिने घोडेगावच्या दिव्य इरिगेशन बंगल्यातील एका बंद व्हरांड्यात मुक्काम ठोकून पाटबंधारे खात्याचा दैनंदिन व्यवहार फार जवळून अनुभवला. नंतरचे सहा महिने