पान:सिंचननोंदी.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकाशकांचे दोन शब्द

 परिवर्तनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना श्री. एम. एम. जोशी यांनी आयुष्यभर मार्गदर्शन केले, प्रेरणा दिली. किंबहुना असे कार्यकर्ते हा त्यांच्या जीवनाचा केन्द्रबिंदु होता.
 कार्यकर्त्यांना सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाच्या विविध समस्यांचे, पर्यायांचे आणि पैलूंचे योग्य आकलन व्हावे आणि देशा समोरील प्रश्नांबाबत त्यांच्या विचारांची दिशा ठरावी यासाठी एम. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनने 'परिवर्तन माला' काढण्याचे योजिले आहे. कार्यकर्त्यांबरोबर इतरांचेही त्यामुळे प्रबोधन होईल. श्री प्रदीप पुरंदरे यांचे 'सिंचन नोंदी' हे पुस्तक त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे.
 दुष्काळ निर्मूलन ही महाराष्ट्रापुढील महत्त्वाची समस्या आहे. त्यासाठी सिंचन धोरण काय असावे याबाबत राज्यात चर्चा चालू आहे. पाणी हे समाजाच्या मालकीचे साधन असल्याने त्याचे योग्य वाटप झाले पाहिजे. तसेच उपलब्ध सिंचन क्षमतेचा अधिकाधिक चांगला वापर झाला पाहिजे. ग्रामीण महाराष्ट्राच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर श्री. पुरंदरे यांनी आपला अभ्यास व अनुभव याच्या आधारे तपशीलवार व व्यवहारात उपयुक्त ठरणारे . विवेचन या पुस्तकात केले आहे.
 फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे महाराष्ट्रात स्वागत होईल अशी आशा आहे. श्री. प्रदीप पुरंदरे यांनी परिश्रमपूर्वक लिहिलेल्या पुस्तकाबद्दल मी फाऊंडेशनच्या वतीने त्यांचे आभार मानतो.

सदानंद वर्दे

सचिव

एम. एम. जोशी

सोशलिस्ट फाऊंडेशन