या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वर्गातून गंगा आणणाऱ्या भगीरथा
तुझे कोरडवाहू वंशज आम्ही
गंगेतून वीस शतकांचे पाणी वाहून गेल्यावर
आजही असहाय्य झगडतो आहोत सनातन दुष्काळाशी
आमच्या हजारो गावांना जलसमाधी देऊन
धरणं बांधली मंत्रालयातल्या वातानुकूलित योजनाकारांनी
आणि आज आमच्या घामावर रक्तावर
पुकपुकतात बच्या बागायतदारांच्या मोटारसायकली
अडवल्या गेलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाने
तरारली आहेत पिके विषमतेची
वाया गेलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाने
बेचिराख स्वप्ने तुझ्या कोरडवाहू वंशजाची