पान:सिंचननोंदी.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंचननोंदी - ११

सिंचनाबद्दल आता कोणी
स्पष्ट बोलेल काय ?

जीवनातील कोणत्याही क्षेत्रात विकासाचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. स्थल-काल- परिस्थितीनुसार प्रत्येक पर्यायाला अंगभूत मर्यादा असतात. कधी एक पर्याय दुसऱ्या पर्यायाला पूर्णतः काटशह देतो. तर कधी काही अंशी त्याला पुरकही ठरतो. एकाच वेळी अनेक पर्यायांचे वास्तव गुंतागुंतही निर्माण करते. पर्यायांची दृश्य विविधता.. वैचित्र्य, सरमिसळ आणि विसंगती यांच्यामागे द्वितसंबंधाची एक अदृश्य सुसंगती असते.
 प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे जसे खास तत्त्वज्ञान व तंत्रज्ञान असते तसेच अर्थकारण, समाजकारण आणि अर्थातच राजकारणही असते. समाजातील एक किंवा अनेक विशिष्ट थर, वर्ग, जाती, स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी काही विशिष्ट पर्यायांचेच समर्थन करतात. इतर पर्याय जनतेपुढे येऊ न देण्याचे कावेबाज व धूर्त प्रयत्नही होतात. मूळ प्रश्नांवरून लक्ष उडावे म्हणून मुद्दाम फसवे अथवा अपुरे पर्याय उभे करून 'कात्रजचा घाट' ही केला जातो. अज्ञान, कुपमंडूक वृत्ती, 'आम्ही शहाणे आमची मक्तेदारी; दुर्लक्ष, बेजबाबदारपणा यामुळेदेखील अनेक चांगले पर्याय पुढे येत नाहीत. त्यांची तांत्रिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय शक्यता तपासलीदेखील जात नाही. मग कालांतराने विकासाचा क्रम चुकला, खर्चिक पर्याय स्वीकारला गेला. फार थोड्या लोकांचाच फायदा झाला वगैरे सत्य बाहेर यायला लागते. पण तोपर्यंत समग्र दूरगामी, तटस्थ, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा बळी दिला गेलेला असतो. हितसंबंधांचे पूल जागोजाग उघडपणे उभे राहिलेले असतात. सर्वच क्षेत्रांत हे होताना आपण पाहात आहोत. सिंचन त्याला अपवाद नाही. आवडते, नावडते, फसवे आणि तपासलेदेखील न गेलेले पर्याय सिंचनक्षेत्रात उदंड आहेत.
 मोठे प्रकल्प, परदेशी, कर्ज, परदेशी सल्लागार, पाणी वाटपाची जुनाट, भ्रष्ट व नोकरशाहीने पछाडलेली शेजपाळी पद्धत, कालवा चालविण्याचे अकार्यक्षम व मागासलेले वरून नियंत्रण (अपस्ट्रिम कंट्रोल) तंत्र, खर्चिक बांधकामे, अर्थहीन नूतनीकरण व वारंवार दुरुस्त्या, डयुटी/ ए.आय.डी.सी. सारख्या कालबाहय अशास्त्रीय संकल्पना है 'पाटबंधारे खात्याचे काही खास आवडते पर्याय !
 तर वेळेवर लक्षपूर्वक पूर्ण केलेले चांगल्या प्रतीचे बांधकाम, कोलव्यांची वेळीच व वेळोवेळी केलेली सुयोग्य देखभाल, सुस्थितीतील पाणीवहन व्यवस्था, पाण्यावर नियंत्रण आणि त्याचा काटेकोरपणे हिशेब, लघु प्रकल्पांना प्राधान्य व त्यांची योग्य देखभाल पाणलोट क्षेत्र विकास, कारभारात खुलेपणा व लोकशाही, कनिष्ठ कर्मचान्यांच्या क्षमतेचा सुयोग्य वापर ही नावडत्या पर्यायांची (अपूर्ण ! ) यादी.
 खरे व मूळ प्रश्न पाणलोट क्षेत्र, धरण व कालवे यामध्ये असताना "तेथे सर्व आलबेल आहे' असे सांगून मूविकास १ व २ ची कामे, रोटेशनल वॉटर सप्लाय (आर, डब्ल्यू. एस. ). प्रत्येक शेतचारीवर प्रवाहमापक आणि विमोचक समित्या हे तद्दन फसवे आणि पूर्णतः फसलेले पर्याय.

५०