पान:सिंचननोंदी.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गतिमान नियमनाचे कॅलिफोर्निया ॲक्वेडक्टवरील अमेरिकन तंत्र नर्मदा कालव्यावर तर प्रॉव्हेन्स दे कॅनालवरील फ्रेन्च तंत्र माही व तुगभद्रा कालव्यांवर आणण्याचे प्रयत्न आज मोठ्या प्रमाणावर होत आहेत. गुजरात व कर्नाटक राज्यांनी याबाबत आघाडी घेतली. जागतिक बँक, यू.एस.एड. वगैरे सोनारांनी कान टोचल्यावर नवीन तंत्र महाराष्ट्रात तोबन्याबरोबर लगाम या नेहमीच्या पद्धतीने येईलच. दरम्यान, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आणि पाणीप्रश्नाबद्दल आत्मीयता बाळगणान्यांनी नवीन तंत्राबद्दल विचार सुरू करायला हवा. कारण सिंचन सुधारण्याची खरी प्रामाणिक निकड त्यांना आहे. सिंचननोंदीत म्हणूनच आपण या तंत्राबद्दल तपशिलात जाऊन चर्चा करणार आहोत. सुरुवात अर्थातच सनातन'वरून नियंत्रण' तंत्रानेच करूयात.
 'वरून नियंत्रण' तंत्रात अपेक्षित पाणीभागणीप्रमाणे कालव्यात खाली पाणी वापरले जाईलच असे गृहीत धरून धरणातून पाणी कालव्यात सोडतात. पाण्याचा प्रवाह कमी जास्त अथवा बंद चालू करणे वगैरे सर्व बदल प्रामुख्याने धरणाच्या पातळीवर कालव्याच्या मुखाशी मुख्यतः पाणी देणान्या सिंचन अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार केले जातात. आणि मग ते बदल हळूहळू कालव्यावर खाली इतरत्र जाणवायला लागतात. भरावाला उतार असलेल्या कालव्यांमध्ये एकदा पाणी सोडले की ते वापरावेच लागते. अचानक पाऊस : पडला किंवा शेतकऱ्यांना रात्री पाणी नकोय अशा प्रकारच्या ऐनवेळच्या काही कारणांमुळे पाणी वापरले न गेल्यास ते नाल्याला वाया जाते. कारण न वापरलेले पाणी कालव्यामध्ये कोठे तरी साठवायची सोय या तंत्रात नसते.
 आज महाराष्ट्रात लघु व मध्यम सिंचन प्रकल्पातील बहुतेक सर्व कालव्यांवर आणि मोठ्या प्रकल्पातील (मुख्य कालवे सोडल्यास इतर ) सर्व वितरिका, मायनर वगैरेंवर वाडवे नियामक (क्रॉस रेग्युलेटरस) फारसे दिलेलेच नाहीत. तेव्हा या सर्व कालव्यांवर ण्याची पातळी व विसर्ग यांचे नियमन करणे खरोखरच अवघड आहे. कालव्यात एकदा पाणी आले की, मग सोडलेला विसर्ग शक्यतो कायम ठेवणे आणि अतिशय बंधने घालणा-या वेळापत्रकानुसार तो वापरणे एवढेच पर्याय शिल्लक राहतात. व्यवहारात बिसर्ग सतत बदलतो. वेळापत्रक बाजूला राहते. पाण्यावर नियंत्रण राहत नाही. 'वरून नियंत्रणाचे' असे हे अत्यंत प्राथमिक, जुनाट व मागासलेले तंत्र आपण सनातन 'काळापासून वापरत आहोत. कालवे चालवण्यातील अकार्यक्षमता व शेतकऱ्यांवर घातलेली अव्यवहार्य बंधने ही मूलतः या तंत्राचा परिपाक आहेत. वाराबंदी, समय वाटपपद्धती वगैरेंचे नुसते फलक लावून आणि कागदावर छान छान वेळापत्रके (अगदी संगणक वापरूनसुद्धा!) करून या तंत्रात काहीही गुणात्मक फरक पडत नाही, पडणार नाही.
 कालव्यावर ठिकठिकाणी आडवे नियामक बसवून वरील तंत्रात काही मर्यादेपर्यंत सुधारणा करता येते. परंतु अनेक महत्त्वाचे प्रश्न तसेच राहतात. उदाहरणार्थ- कालवे चालवण्यासाठी वेळापत्रक करून ते सर्वांना बंधनकारक करावेच लागते. समजा मध्येच 'कोठे तरी पाणी घ्यायचे थांबवले गेले तर कालव्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाणी राहते. कालवा भरून पाणी वाहण्याची वा फुटण्याची शक्यता निर्माण होते. हे जास्तीचे पाणी नियंत्रित करण्यासाठी दुसरीकडे कोठे तरी तेवढेच पाणी घ्यायला भाग पाडावे लागते. एस्केपमधून नाल्यात सोडून तरी द्यावे लागते किंवा धरणापासून खाली एक एक आडवा नियामक बंद करत थावे लागते. फार मोठ्या लांबीच्या कालव्यांवर हे सर्व फक्त मानवी हस्तक्षेपाच्या जोरावर वेळच्या वेळी काटेकोरपणे त्वरित करणे अनेक कारणांमुळे अवघड व त्रासदायक असते.

२९.