पान:सिंचननोंदी.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंचननोंदी - ६

कालवा चालविण्याची तंत्रे :
वरून नियंत्रण

कालवे चालवण्याची म्हणजेच धरणात साठवलेले पाणी शेतापर्यंत नेण्याची अनेक तंत्रे आज जगात विकसित झालेली आहेत. सर्वसाधारणपणे खालील चार प्रकारांत या तंत्रांचे वर्गीकरण करता येते.
१) वरून नियंत्रण (अपस्ट्रिम कंट्रोल)
२) खालून नियंत्रण (डाऊन स्ट्रीम कंट्रोल)
३) संयुक्त नियंत्रण (कॉम्बीनेशन कंट्रोल)
४) गतिमान नियमन (डायनेमिक रेग्युलेशन)
 हे वर्गीकरण अनेक तांत्रिक गोष्टींवर, घटकांवर अवलंबून असले तरी पाणी देणारे सिंचन अधिकारी आणि पाणी घेणारे शेतकरी यांचे परस्परसंबंध व निर्णय प्रक्रियेतील त्यांचे स्थान हाच मुद्दा नेहमी महत्त्वाचा असतो.
 सार्वजनिक कालवे संघटितरीत्या चालवण्याची सुरुवात जेव्हा केव्हा झाली असेल तेव्हापासून कालवे चालवण्याची 'वरून नियंत्रण' पद्धत अनेक कारणांमुळे जगात सर्वत्रच अस्तित्वात आली. आजही ती अनेक ठिकाणी टिकून आहे. भारतात सध्या हीच पद्धत आपण वापरतो. पाण्याच्या संदर्भातले सर्व निर्णय मूठभर सर्वज्ञ (!) सिंचन अधिकाऱ्यांनी घ्यायचे. आणि अज्ञानी (!) शेतकऱ्यांनी व नम्र (!) कनिष्ठ अधिकान्यांनी ते गुपचुप स्वीकारायचे हे त्या तंत्राचे व्यवच्छेदक लक्षण.
 'पाणी आम्हा शेतकऱ्यांचे आहे. शेती आम्ही करणार आहोत. पाणी आणि शेतीबाबत तुम्हा सिंचन अधिकान्यांपेक्षा आम्हाला जास्त कळते. आम्हाला हव्या असलेल्या पिकांसाठी पाणी केव्हा, कधी व किती द्यायचे या संदर्भातले सर्व निर्णय आम्ही घेणार, हे शक्य होण्यासाठी ज्या प्रकारचे कालवे लागतील ते तुम्ही डिझाईन करा. बांधा' ही भूमिका घेऊन खालून नियंत्रण पद्धत अमेरिका व युरोपात उदयाला आली.
 एकीकडे मागणीच्या तुलनेत पाण्याची कमतरता व म्हणून रेशनिंगची आवश्यकता तर दुसरीकडे शेतकऱ्यांना हवे असलेले संपूर्ण निर्णयस्वातंत्र्य व त्यातून उद्भवणारी स्वैराचाराची भीती या परस्परविरोधी गोष्टींतून जाणवायला लागलं की सार्वजनिक वितरण व्यवस्थेत केवळ वरून अथवा केवळ खालून नियंत्रण व्यवहार्य नाही. योग्य नाही. कोठे तरी सुवर्णमध्य गाठायला हवा. म्हणून या दोन्ही पद्धतीचे फायदे मिळविण्यासाठी 'संयुक्त नियंत्रण' तंत्राचा विकास झाला. आज मोरक्कोतील काही सिंचन प्रकल्पात संयुक्त नियंत्रण तंत्र वापरात आहे.
 'इलेक्ट्रॉनिक्स, रिमोट कंट्रोल, संगणक, आधुनिक दूरसंचार व्यवस्था आणि प्रगत 'जलगतिशास्त्र यांच्या वापरातून कालवा चालवण्याच्या तंत्रात आमूलाग्र सुधारणा झाल्या आणि अमेरिका व फ्रान्समध्ये गतिमान नियमन या अत्याधुनिक तंत्राचा जन्म झाला. पाण्याची मागणी व पुरवठा आणि कालव्यातील पाण्याची पातळी व विसर्ग या गोष्टी सतत बदलत असतात. ही प्रक्रियाच मुळात गतिमान आहे. तेव्हा प्रक्रियेच्या गतिमानतेला न्याय द्यायचा असेल तर त्या प्रक्रियेचे नियमनही गतिमान पद्धतीनेच केले पाहिजे. तरच कालवा वालवण्यातील व पाणीवाटपातील विसंगती कमी होतील.

२८