पान:सिंचननोंदी.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कनिष्ठ कर्मचान्यांनी केलेले पंचनामे रद्द होतात. चांगले काम करणाऱ्या प्रामाणिक सिंचन अधिकाऱ्याला प्रोत्साहन व संरक्षण मिळत नाहीच, उलट त्याची बदली होते. सिंचन व्यवस्थापनात सर्व पातळ्यांवर आलटून पालटून तेच तेच चेहरे दिसतात. मेरी, सिडिओ, . डीआरआरंडी. आय. पी. आय. डिझाईन डिव्हिजन्स अशा पाटबंधारे खात्याच्याच इतर विभागांतील बहुसंख्य अभियंत्यांना सिंचन व्यवस्थापनाकडे फारसे फिरकूही दिले जात नाही. वाल्मी प्रशिक्षित अधिकाऱ्यांना तर शक्यतो टाळलेच जाते. सिंचन व्यवस्थापनावर. उच्चाधिकार समितीने १९८१ साली ओढलेल्या ताशेन्यांवर काहीही अधिकृत भूमिका जाहीररीत्या घेतली जात नाही. या सुपरिचित व बहुचर्चित परिस्थितीचे विश्लेषण कसे करायचे ? या परिस्थितीला कोण जबाबदार ?
 राजकीय हस्तक्षेपाचा बाऊ करण्यातही फारसा अर्थ नाही. तो कोणत्या क्षेत्रात नाहीये ? आणि मुळात आपण स्वीकारलेल्या लोकशाही पद्धतीत विविध विकासकामांत सर्व पातळ्यांवर चांगला व परिणामकारक राजकीय हस्तक्षेप व्हावा हेच अभिप्रेत आहे. गुणात्मकरीत्या चांगला. छोट्या व मध्यम शेतकऱ्यांच्या बाजूचा, पर्यावरणाची चाड ठेवणारा, आधुनिक तंत्रज्ञानाचा आदर करणारा आणि महाराष्ट्राच्या दूरगामी हिताच्या दृष्टीने आवश्यक असा राजकीय हस्तक्षेप उलट वाढायला हवा. तोच खऱ्या अर्थाने लोक सहभाग! राजकीय हस्तक्षेपाची ढाल करून आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरून घालायचे हे बरोबर नाही. समजा, आपण जादूने राजकीय हस्तक्षेप क्षणार्धात नाहीसा करू शकलो तर. आपले सिंचन व्यवस्थापन कार्यक्षम होईल ? तरीदेखील ते होणार नाही. कारण कार्यक्षम सिंचनासाठी लागणाऱ्या किमान तांत्रिक गोष्टी व आधुनिक तत्त्वे आपल्याकडे मुळातचं नाहीत.
 सुस्थितीतील पाणीवहन व्यवस्था, आधुनिक पाणीनियंत्रण व्यवस्था, आधुनिक संदेशवहन व्यवस्था, प्रगत जलग़तिशास्त्राचा वापर वगैरे वगैरे गोष्टी चांगल्या सिंचनाच्या कांही पूर्वअटी आहेत. त्या आज आपल्याकडे नाहीत. परंतु फक्त या गोष्टीसुद्धा पुरेशा नाहीत. पाणीवाटपाच्या आणि कालवा चालवण्याच्या कोणत्या तत्त्वाने या गोष्टी आपण वापरणार आहोत हे महत्त्वाचे. आणि आपल्या सिंचनाचे खरे दुखणे येथेच आहे!
 पूर्वापार चालत आलेल्या सनातन 'अपस्ट्रिम कंट्रोल' पद्धतीने (वरून नियंत्रण' पद्धतीने) आपण आज अत्यंत गावठी व रामभरोसे प्रकारे आपले सिंचन प्रकल्प चालवतो. हा अपस्ट्रिम कंट्रोल जोपर्यंत आपल्या मानगुटीवर बसेल तोपर्यंत आपले सिंचन सुधारण्याची सुतराम शक्यता नाही..
 काय असतो हा अपस्ट्रिम कंट्रोल ? तांत्रिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय पातळ्यांवर तो कोणती रूपे धारण करतो ? त्याला चांगले पर्याय आहेत का ? पुढच्या सिंचन नोंदीत आपण या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देऊ. ती द्यायलाच हवीत. कारण अपेक्षित सामाजिक, राजकीय बदलासाठी तंत्रज्ञानातही जाणीवपूर्वक बदल करावे लागतात. ती वेळ आज आलेली आहे.

(२२ आक्टोबर ८९)



२७