पान:सिंचननोंदी.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिशिष्ट : निवृत्त सिंचन अधिकारी असे म्हणतात
एक

 ....नवीन सिंचनक्षमता निर्माण करण्याच्या दिलेल्या लक्षाकांची पूर्तता करण्याकरता. पूर्ण झालेल्या क्षेत्रफळाचे आकडे घोषित केलेले असले तरी प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण अवस्थेमध्ये किंवा जेमतेम पाणी जाण्याच्या परिस्थितीत असतात. मुख्यत्वे करून कालव्याच्या तळातील दगडाचे खोदकाम, कालव्याचे अस्तर, आडव्या नियामकांचे बांधकाम, त्यांचे दरवाजे, वितरिका व चाऱ्या पाणी मोजण्याची साधने वगैरे कामे बहुतेक अर्धवट अवस्थेमध्ये किंवा हाती घ्यावयाची राहिलेली असतात. लाभधारकांना मात्र पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची सिंचनक्षमता निर्माण करून त्याचा वापर झाल्याचे दर्शवण्याकरता हमी दिलेले असते....
 प्रत्येक प्रकल्पाचे भौगोलिक, वातावरण, पाऊस पाण्याची उपलब्धता, माती, त्यानुसार आखलेली पीक पद्धती वगैरे गोष्टींमुळे एक प्रकारचे वैशिष्ट्य (Project Specific) असते. त्याची माहिती तर या अधिकान्यांना (जल व्यवस्थापन विभागाच्या) करून दिलेली नसतेच, पण प्रकल्पांच्या निरनिराळ्या बांधकामाचे नकाशे, प्राक्कलने, बांधकामात वापरण्यात आलेले सामान, कालव्याची क्षमता, प्रत्यक्ष पाणी जाऊ शकेल अशा लाभक्षेत्राचे नकाशे, बांधकामाचे वर्णन पूर्णत्व अहवाल वगैरे गोष्टीसुद्धा त्यांना पद्धतशीर दिलेल्या नसतात.
 अपुरी माहिती, अल्प मनुष्यबळ, अर्धवट बांधकामे, त्यामध्येच बांधकाम विभागा (Construction Wing) कडून उरलेली कामे पूर्ण करण्याकरिता कालवे लवकर बंद करून अथवा दोन पाळ्यामध्ये जास्त अंतर ठेवून कामे करण्याचा आग्रह वगैरे गोष्टींमुळे तसेच दुसन्या बाजूस शेतात पाणी देण्याच्या पद्धतीची (सारे, सारी) माहिती नसलेले पाणी वेळेप्रमाणे घेण्यात लागणाऱ्या शिस्तीचा अभाव असलेले शेतकरी, त्यांचा अधिक पाणी सोडण्याकरता येणारा दबाव त्यामधून उद्भवलेल्या तक्रारी वगैरे गोष्टींमुळे जलव्यवस्थापनामध्ये रूढी, शिस्त, पद्धत बसवण्यास त्यांना (ज.व्य. विभागाच्या अधिकाऱ्यांना सवड होत नाही. पाणी अनुमान धपक्यानें (Adhoc) सोडण्यात येते. त्याचे मोजमाप हिशेब ठेवता येत नाहीत व व्यवस्थापनेपेक्षा तक्रारी निवारण्यात वेळ खर्च होतो. प्रथमपासून व्यवस्थापनाची घडी बसली नाही, देखभाल दुरुस्ती झाली नाही तर प्रत्येक नव्याने सुरू होणाऱ्या हंगामात परिस्थिती अधिकच बिघडत जाते व प्रकल्पाची क्षमताही कमी होऊ लागते...
 "सिंचन प्रकल्पांचे बांधकाम विभागाकडून जलव्यवस्थापन विभागाकडे सुलभ पद्धतशीर हस्तांतर' श्री. श्री. ना. लेले, निवृत्त मुख्य अभियंता, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र सिंचन विकास विशेषांक एप्रिल १९८९.

दोन

 ...या (सिंचन) प्रकल्पांचे पाण्यापासून अधिक उत्पादन होण्याकरिता लाभक्षेत्रामधील सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात वेळेवर व योग्य तेवढे पाणी देणे महत्त्वाचे आहे व त्याकरिता आवश्यक असणारे कर्मचारी नेमणे, धरणे कालवे व शेतचाऱ्यांपर्यंत येणारे सर्व प्रकल्पांतर्गत जाळे सुस्थितीत ठेवणे, त्याची कार्यक्षमता टिकविणे वगैरे गोष्टी नवीन प्रकल्प बांधण्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या व जरूरीच्या आहेत.
 'परंतु प्रत्यक्षात प्रकल्पांची देखभाल व दुरुस्ती याकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही असे दिसते. अजूनही शासनाची तसेच सिंचनखात्याची ओढ, लक्ष व घाई नवीन प्रकल्प हाती घेणे. अनेक प्रकल्प एकाच वेळी सुरू करणे व त्याकरिता जेवढी शक्य होईल तेवढी आर्थिक तरतूद तसेच अभियंते व इतर कर्मचारी नेमणे याकडे आहे. परिणामी

२२