पान:सिंचननोंदी.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अडीअडचणी दूर करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन ते कधी करतात का ? कालवे चालवण्याचे शास्त्र व तंत्र विशद करणारे अधिकृत शासकीय मॅन्युअल आपल्याकडे आहे का ? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे अभियंते शोधणार आहेत का ?
 कालवा चालवण्याचे वेळापत्रक, पाणीवाटपाचा कार्यक्रम व त्याप्रमाणे प्रत्यक्षात पाणीवाटप करायचे झाल्यास अभियंता नसलेला परंतु पाण्याबद्दल आत्मीयतेने विचार ` करू शकणारा सामान्य माणूसही काही प्राथमिकरीत्या आवश्यक गोष्टी सहज सांगू शकेल. पाणीवाटप करायचे असेल तर वाटपासाठी पाण्याचे मोजमाप करायला हवे. मोजमापासाठी यंत्रे हवीत, पाणी ज्या कालव्यातून, वितरिकांतून मायनरमधून वाटायचे ती पाणीवहन व्यवस्था किमान सुस्थितीत असायला हवी, कालवा वितरिका, मायनरमधून नक्की किती पाणी कोणत्या परिस्थितीत वाहू शकते आणि एकंदरितच आपल्या कालव्यांच्या मर्यादा काय याची पाणीवाटप करणाऱ्यांना पुरेशी कल्पना हवी. वेळापत्रकाचा प्रश्न असल्यामुळे धरणातून कोरड्या कालव्यात पाणी सोडल्यावर ठराविक ठिकाणी पोहोचायला किती पाण्याला किती वेळ लागतो तसेच कालवा चालू असताना प्रवाहात बदल केल्यास तो बदल ठराविक ठिकाणी किती वेळाने शंभर टक्के जाणवेल वगैरे गोष्टींचा अभ्यास हवा. कालव्यातून वाहणान्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यात जरूर ते बदल योग्य वेळी योग्य ठिकाणी करण्यासाठी कालव्यांमध्ये काही किमान पाणीनियंत्रण व्यवस्था तरी हवी. वगैरे वगैरे !

पाणी मोजणे

 पहिला मुद्दा पाण्याच्या मोजमापाचा.. काय परिस्थिती आहे ? अनेक ठिकाणी पाणी मोजायची यंत्रेच बसवलेली नाहीत. जेथे बसवली आहेत तेथील बहुसंख्य नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यांची दुरुस्ती व देखभाल वेळेवर व धड होत नाही. पाणी मोजण्याच्या शास्त्रीय प्रक्रियेबद्दलचे अज्ञान प्रशिक्षणाने दूर करता येईल पण प्रत्यक्ष पाणी वाटपात काम करणाऱ्यांना मोठ्या संख्येने प्रशिक्षणाला पाठवलेच जात नाही. ज्यांना चुकून पाठवले ते परत सिंचन व्यवस्थापनातच जातील याची हमी नाही. कागदावर आणि वातानुकूलित चर्चासत्रात कोणी काहीही सांगो पाटबंधारेखात्यातल्या सध्याच्या एकंदर वातावरणात पाणी मोजणे या प्रकाराला मानाचे स्थान नाही. उलट जो व्यवस्थित पाणी मोजून काटेकोर हिशेब अधिकृतरीत्या आग्रहपूर्वक ठेवेल तोच गोत्यात. येईल. त्याची बदली होईल.
 एकविसाव्या शतकाकडे जाण्याच्या गोष्टी करताना आजही फक्त आठ्या मोजून (दार एवढ्या आठ्यांनी वर उचलले वगैरे) पाणी सोडताना अभियंते आढळतात. उपलब्ध (चुकीच्या) पाणीमापकाच्या आधारे मोजमाप करून अभियंते ज्या विसर्गाला २७५ क्युसेक म्हणतात तो प्रत्यक्षात योग्यरीतीने मोजल्यावर फक्त १५० क्युसेक कसाबसा भरतो. पाणीवाटपाचा कार्यक्रम मात्र २७५ क्युसेक गृहीत धरून केला जातो. मायनरमध्ये पाणी न मोजता त्यातून वाहणारे पाणी हैं दहा वर्षापूर्वी केलेल्या डिझाईनप्रमाणे साडेदहा क्युसेकच आहे असे गृहीत धरून सिंचन करणाऱ्या शाखाधिकाऱ्याला प्रत्यक्षात पाणी मोजून ते फक्त सहा क्युसेक आहे हे दाखवून दिले तर खरोखरच आश्चर्य वाटते. साडेदहा क्युसेक गृहीत धरून कार्यक्रम केला व प्रत्यक्षात सझ क्युसेकच पाणी मिळाले तर तो पाणी वाटपाचा कार्यक्रम अमलात येईल का ? अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या तर ते मात्र अडाणी, गैरशिस्त आणि कांगावखोर!
 चुकीच्या पाणीमापक यंत्राचा फायदा घेऊन किंवा ती यंत्रे मुद्दाम बिघडवून काही बलदंड शेतकऱ्यांनी पाणी चोरणे ही बाब सर्वांनाच माहीत आहे. परंतु अशाच पद्धतीने उपविभागच एकमेकांचे पाणी चोरतात, आपसात भांडतात हे कदाचित सर्वांना माहीत

२०