पान:सिंचननोंदी.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंचननोंदी - ४

पाणीवाटप कार्यक्रम

 क्त सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी झालेली असणे, सुधारित टँक चार्टस् तयार न केल्यामुळे व पाण्याचा विश्वासार्ह हिशेब काटेकोरपणे न ठेवल्यामुळे धरणात नक्की पाणी किती याबद्दलचे अंदाजच चुकणे, जुन्यापुरान्या, अशास्त्रीय, कालबाह्य पद्धती वापरून पी. आय. पी. (पाण्याचे अंदाजपत्रक)चे कर्मकांड उरकणे, १९३४ सालच्या पाणी अर्जाचे किचकट अवाढव्य विहित नमुने १९९२ सालीही न बदलणे, १९७६ सालच्या सिंचन कायद्याचे नियम तयार करण्याकडे थोडीथोडकी नव्हे 'तर १६ वर्षे सातत्याने दुर्लक्ष करणे, पाणीअर्ज मंजूर करण्यात दिरंगाई करणे, पाणी मागणीपत्रके घोळदार, अशास्त्रीय ए. आय. डी. सी. व भानगडीचे लॉसेस वापरून तयार करणे वगैरे गोष्टींची चर्चा आपण आतापर्यंत सिंचननोंदीत केली. आज आपण कालवा चालवण्याचे वेळापत्रक व पाणीवाटप कार्यक्रम याबद्दल काही मुद्दे नोंदवणार आहोत.
 संपूर्ण सिंचन विभागातील पाणी मागणीपत्रके एकत्र करून तपासल्यावर कार्यकारी अभियंत्याने कालवा चालवण्याचे वेळापत्रक (Canal Operation Schedule ) व पाणीवाटप कार्यक्रम (Water Distribution Programme) तयार करणे आवश्यक असते.
 या वेळापत्रकात व कार्यक्रमात कालवा नक्की कोणत्या तारखांना चालू राहील, दरदिवशी धरणातून किती पाणी सोडण्यात येईल, त्यापैकी किती पाणी कोणकोणत्या उपविभागांनी त्यांची मागणी विचारात घेता प्रत्येकी किती दिवस कोणत्या क्रमाने वापरायचे आहे याचा तपशील द्यावा लागतो. अशी वेळापत्रके व कार्यक्रम विभागाने उपविभागांसाठी, उपविभागाने सिंचन शाखांसाठी, सिंचनशाखेने प्रत्येक बीटसाठी त्या त्या पातळीवरील तपशिलासकट तयार करून द्यायची असतात. शेवटी प्रत्येक बीटमध्ये कालवा निरीक्षकाने शेतकऱ्यांमध्ये पांणीवाटप करण्यासाठी प्रत्येक विमोचकासाठी पाळीपत्रके तयार करायची असतात. थोडक्यात, प्रत्येक वितरिका, मायनर व चारी कधी सुरू होणार, त्यातून दर दिवशी किती पाणी वाहणार, ते कोणी कधी किती घ्यायचं आणि शेवटी पाणी बंद कधी होणार हे सर्व पूर्वनियोजित असायला हवे. असे पूर्वनियोजन झाल्यावर मग प्रत्यक्षात त्याप्रमाणे कालव्यात पाणी सोडून त्याचे सिंचन अधिकाऱ्यांच्या जागरूक देखरेखीखाली सुयोग्य वाटप व्हावे अशी अपेक्षा असते. शासनाने घालून दिलेल्या या पद्धतीचे वर्णन जरी मोठे प्रकल्प डोळ्यांसमोर ठेवून केलेले असले तरी अशीच पद्धत योग्य त्या बदलांसकट मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात राबवायला हवी हे मुद्दाम सांगण्याची गरज आहे.

नियोजन

 सर्व मोठ्या, मध्यम व लघु सिंचन प्रकल्पात असे काटेकोर पूर्वनियोजन आपण मुळात करतो का ? त्यासाठी किती वेळ देतो ? किती गांर्भीयाने ते करतो ? हवामान, पिकांच्या पाण्याच्या गरजा व जलगतिशास्त्र (Hydraulics) याचा किती प्रमाणात त्यासाठी वापर करतो ? वेळापत्रक व कार्यक्रम केलेच तर ते तसेच अमलात यावेत म्हणून आपण कोणते व किती प्रयत्न करतो ? आपले कालवे चालवण्याचे दैनंदिन अनुभव, त्यातील अडचणी व संभाव्य सुधारणा याबाबत त्रयस्थ भूमिकेतून आपण कधी काही शास्त्रीय विश्लेषण करतो का ? वरिष्ठ अधिकारी या सर्व प्रक्रियेबद्दल आग्रह धरतात का ?