पान:सिंचननोंदी.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंचननोंदी - २

पाण्याचे अंदाजपत्रक

 कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता जेव्हा मागणीपेक्षा कमी अस तेव्हा त्या वस्तूंच्या वाटप व वापर व्यवस्थेबाबत संबंधित उच्च पदस्थांनी जास्त जागरूक. असावे, जबाबदारीने निर्णय घ्यावेत, निर्णय घेताना नवीन वैज्ञानिक व व्यवस्थापकीय निकष काटेकोरपणे लावावेत, सामाजिक न्यायाचे भान ठेवावे, वाटप व वापराच्या पद्धतीमध्ये वारंवार डोळस सुधारणा कराव्यात, आपल्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन वेळोवेळी सुयोग्य मार्गदर्शन करावे आणि त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून वेळच्या वेळी चांगली कामे जाणीवपूर्वक करून घ्यावीत अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पाण्याच्या वाटप व वापर व्यवस्थेबाबत तर हे आवर्जून व्हायलाच हवे. कारण सुयोग्य वापराने पाणी जीवन फुलवते. दुर्लक्ष आणि बेहिशेबीपणा झाला तर हेच पाणी जीवन नासवते. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या अंदाजपत्रकाबाबत काही मुद्दे येथे मांडले आहेत.

महाराष्ट्रातील पद्धत

 उपलब्ध पाण्याचे रबी व उन्हाळी हंगामासाठी अंदाजपत्रक तयार करण्याची आणि पाणी वाटपाचे व वापराचे हिशेब ठेवण्याची एक पद्धत सुदैवाने महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्यात प्रथमपासूनच आहे. इतर राज्यांत ही पद्धत फारशी अस्तित्वात नाही हे मुद्दाम नमूद करायला हवे. आपण प्रथम या पद्धतीची थोडक्यात तोंडओळख करून घेऊ आणि मग तपशिलाबद्दल चर्चा करू.
 महाराष्ट्रात १ जुलै ते ३० जून या कालावधीला सिंचनवर्ष मानण्यात येते. १ जुलै ते १४ ऑक्टोबर (१०६ दिवस) खरीप, १५ ऑक्टोबर ते फेब्रुवारी अखेर (१३७ दिवस) रबी, १ मार्च ते ३० जून (१२२ दिवस) उन्हाळी असे विविध हंगामही निश्चित करण्यात आले आहेत.
 सर्वसाधारणपणे खरिपात पाऊस असतो. पाण्याची मागणी उपलब्धतेच्या तुलनेत खूप कमी व अनिश्चित असते. धरणेही अजून पूर्ण भरायची असतात. पाण्याची उपलब्धता नक्की माहीत झालेली नसते. या कारणांमुळे पाऊस व्यवस्थित असलेल्या खरिपात पाण्याचे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रथा नाही.
 रबी हंगाम सुरू व्हायच्या थोडे अगोदर मात्र धरणातील पाणी उपलब्धतेचे चित्र स्पष्ट होते. खरिपात साठवलेले हे मर्यादित पाणी रबी व उन्हाळी हंगामात वापरण्यासाठी पाण्याचे अंदाजपत्रक तयार करावे लागते. प्रत्यक्ष सिंचन करताना पाण्याचा हिशेब ठेवावा लागतो. शेवटी सिंचनपूर्तता अहवाल तयार करून अंदाजपत्रकाबरोबर त्याची तुलना करून दोन्हींतील फरकाबाबत स्पष्टीकरण द्यावे लागते. है सर्व करण्यासाठी शासनाने खालील पंचसूत्री पद्धतच प्रथमपासून घालून दिलेली आहे.
 १) रबी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याचे एकत्रित अंदाजपत्रक कार्यकारी अभियंत्यांनी तयार करावे. अधीक्षक अभियंत्यांनी ते जरूर त्या सुधारणांसकट मंजूर करावे. या अंदाजपत्रकात पाण्याची उपलब्धता आणि विविध उपयोगांसाठी पाण्याची अपेक्षित मागणी यांची सांगड घालण्यात यावी. या अंदाजपत्रकास प्रारंभिक सिंचन कार्यक्रम असे म्हणतात. (Preliminary Irrigation Programme पी.आय.पी. म्हणून प्रसिद्ध)

१०