पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/9

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकात्मतेचीच शिकवण दिली. सर्व धर्मग्रंथांची शिकवण एकच आहे, हे दारा शिकोह याने सांगितले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कला साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाली व त्यातून अनेक नवे प्रकार जन्मास आले. तिसरी गोष्ट म्हणजे विज्ञान, ज्योतिष आणि आयुर्वेद यांच्यामध्येपण देवाणघेवाण झाली व या समन्वयातून एकतेची भावना अधोरेखित करणारी भारतीय संस्कृती निर्माण झाली. त्यांच्यामते ही एकता हे साध्य नसून साधन आहे, ज्या द्वारे आपण उच्चतर जीवन आदर्श प्राप्त करू शकू.
 आपल्या एका निबंधात हजारीप्रसादांनी सभ्यता व संस्कृती यातील भेद स्पष्ट केला आहे. त्यांच्या मते सभ्यताही आर्थिक व्यवस्था, राजकीय संघटना, भौतिक परंपरा व ज्ञान-कला या चार स्तंभांवर उभी असते. समाजातील सर्वसाधारण माणसांचे भय दूर होऊन त्याने सामंजस्याने व सहकार्याने राहणे हे सभ्यातेचे वैशिष्ट्ये असते. संस्कृती माणसाच्या आंतरिक विकासास साह्य करते. सभ्यता व संस्कृती परस्परपूरक आहेत. भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या घटकांचा विचार करताना त्यांनी वेदांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. कारण त्यांच्यामते वेद सत् व असत मधील फरक स्पष्ट करतात. अहिंसा विश्वबंधुत्व, चित्तशुद्धी व सर्वहितपरायणतेवर भारतीय संस्कृती आधारलेली आहे, असे त्यांचे मत होते.
 तेराव्या शतकात भारतावर इस्लामचे आक्रमण झाले व हिंदूच्या हातातील राजकीय सत्ता नष्ट झाली. त्यानंतरच्या बदलत्या काळात आक्रमक व विजिगीषु इस्लामला तोंड देताना हिंदू समाजाने आपल्या धर्म व्यवहारात कशा प्रकारे बदल केले याचे अभ्यासपूर्ण विवेचन हजारीप्रसादांनी केले आहे. त्यांच्या कबीरावरील पुस्तकातील एका प्रकरणाचा डॉ. लवटे यांनी अनुवाद केला आहे. त्यांच्यामते इस्लामच्या आगमनानंतर हिंदू स्मृतिकारांनी व निबंध ग्रंथांनी मतामतांच्या वलयातून एक हिंदू आचार पद्धती तयार केली. तिला मान्यता मिळाली नाही पण ती लागू झाली. त्याचबरोबर त्यामुळे हिंदू अधिक कर्मठ, बंदिस्त व कर्मकांडी बनला. इस्लाम हिंसक पण ग्रहणशील आणि समावेशक धर्म होता. हिंदू धर्म कमी ग्रहणशील होता. याच काळात सूफी संतांचा व नाथपंथाच्या योग्याचा उदय झाला. त्यांनी प्रेमाला, आंतरिक जागृतीला महत्त्वाचे स्थान दिले व कर्मकांडाचा अव्हेर केला. कबीरदासांनी या दोन्ही पंथांचा समन्वय केला नाही. ते क्रांतिकारक विचारवंत होते. त्यांनी कर्मकांडास व बाह्योपचारास रजा दिली आणि मनुष्याप्रती प्रेम व