पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सर्वाधिक विकास या काळात घडून आला. स्तूप, मंदिरे स्तंभाची उभारणी या काळात मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. मुक्तिबोधांनी हा काळ वर्णन शैलीने रंगवत तो मूर्त बनवला आहे. भारताच्या अनेक वस्तुसंग्रहालयात या काळातील शिल्पे, शिलालेख, पाहावयास मिळतात.


१२. भारताचे सुवर्णयुग


 इसवी सनाचे चौथे, पाचवे शतक भारताच्या सर्वांगीण उन्नतीचे द्योतक ठरले. तत्त्वज्ञान, साहित्य आणि विज्ञान या क्षेत्रात नवी प्रतिमाने कायम केली. या काळात समुद्रगुप्त, स्कंदगुप्तसारखे कर्तृत्ववान राजे जन्मास आले नि त्यांनी आपल्या प्रचंड पराक्रमाने आपल्या साम्राज्यास सुवर्ण कळसावर पोहोचवले. घराण्याचा हा काळ. या काळात शकांचे साम्राज्य लयाला गेले. पुढे गुप्त साम्राज्याची पण तीच गत झाली. हुणांचे आक्रमण झाले. सन ३२० ला स्थापन झालेले गुप्त साम्राज्य ४८८ मध्ये लोप पावले.


१३. हर्षवर्धन


 प्राचीन सुवर्ण भारताचे अंतिम किरण म्हणून मुक्तिबोधांनी हर्षवर्धनची केलेली भलामण सार्थक अशासाठी ठरते की त्याच्यानंतर नाव घेण्यासारखा म्हणून सम्राट उदयाला आला नाही. सम्राट हर्षवर्धनपूर्वी प्रभाकरवर्धन गादीवर आला. त्याला तीन अपत्ये. राजवर्धन, हर्षवर्धन व राजश्री. राजश्री सुशिक्षित व सुंदर होती. गृहवर्माशी तिचा विवाह झाला. त्याचा पोटशूळ हूणात उमटला. हुणांच्या हल्ल्यात गृहवर्मा कामी आला. राजश्री कैद झाली पण ती निसटली. ती आत्महत्या करणार तेवढ्यात हर्षवर्धननी तिला वाचवलं. सिनेमासदृश कथांनी इतिहासही भरलेला असतो हेच खरे. सम्राट हर्षवर्धन माणुसकी असलेला राजा म्हणून सर्वश्रुत होता. तो शैव धर्मीय होता. विद्वान होता. पंडितांशी शास्त्रार्थ करायचा. महापंडित संमेलनांचे तो आयोजन करत असे. तो नाटककारही होता. त्याने 'रत्नावली', ‘नामानंद', 'प्रियदर्शिका सारखी नाटकं रचली होती. कादंबरी' चा रचयिता बाणभट्ट हर्षवर्धनचा समकालीन. त्याने ‘हर्षचरित्र' लिहिले होते. यातूनही हर्षवर्धनची महत्ता उमजते.

साहित्य आणि संस्कृती/८६