पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४. विंध पर्वतातलीकडे


 विंध्य पर्वतापलीकडचा भारत म्हणजे दक्षिण भारत. भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने उत्तर भारत आकाराला येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता अशी आश्चर्यकारक तथ्ये विशद करणारे मुक्तिबोध बहुश्रुत होते, असे हा अध्याय वाचताना लक्षात येते. विंध्य ओलांडून उत्तरेकडून दक्षिणायन करणारे पहिले ऋषी म्हणून अगस्त ऐतिहासिक ठरतात. इथे येऊन त्यांनी तमिळ भाषेत प्रावीण्य मिळविले होते. या भाषेचे पहिले व्याकरण लिहिण्याची संधी त्यांना लाभली. या कार्यामुळे आज तमिळ वर्तमानातील सर्वाधिक जुनी भारतीय भाषा म्हणून ओळखली जाते. भारतीय संस्कृती, साहित्याची आद्य लिखिते तमिळमध्येच आढळतात. भारतीय भाषेतील पहिला शब्द कोशही तमिळमध्ये जन्माला आला. तेलुगू, कन्नड, मल्याळम् या दक्षिणी भाषा समृद्ध करण्याचे श्रेय तमिळला दिले आहे. द्रविडी भाषात मराठी मात्र अनेक अंगांनी वेगळी दिसून येते.

 हा काळ सातवाहन घराण्याचा. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर तेर, जुन्नर, कराड, नाशिक, गोवर्धनादि शहरे याच काळात वसली. म्हणून तिथे आज प्राचीन संस्कृतीचे अवशेष उत्खननात सापडतात. यात कोल्हापूर (पोहाळे) पण येते हे विशेष. मुक्तिबोध इतिहासाची सांगड संस्कृतीशी घालत या ग्रंथाचे लेखन करत राहिल्याने हा ग्रंथ एखाद्या सुरस व चमत्कारिक कथा, कादंबरीसारखा वाचकांना रोचक वाटतो. ते कौतुहल वर्धक लेखन कौशल्यामुळे. या काळातच भारतीय व्यापारी जावा, सुमात्रा, हिंद चीन, मलायाला गेले होते. म्हणून वरील शहरातील उत्खननात अनेक विदेशी हस्तिदंती वस्तू, शिल्पे आढळून आली. चालुक्य, पुलकेशी, चोल राजे असो वा राष्ट्रकुल, केरळसारखी राज्ये असोत, सर्वांचीच विलोभनीय वर्णने या खंडात आढळतात व ती वाचकांना इतिहासकाळात हरवून टाकतात.


१५. विशाल भारत


 प्राचीन भारताचा जगातील अनेक देशांशी नुसता संपर्कच नव्हता तर अनेक देशांत भारतीय विद्येची केंद्रे होती. विशेषतः आशिया खंडात उत्तर आशियात खोतन, कुचर, काराशहर, तुरफान, काशगर, शानशान, पोलकिया, यारकंद इत्यादी ठिकाणी ही केंद्रे होती. ती सिक्यांग, मंगोलियापर्यंत पोहोचली

साहित्य आणि संस्कृती/८७