पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ग्रंथ. अशा या श्रेष्ठ साहित्यकारांची प्रशस्ती करताना भारतीय साहित्य अकादमीचे पहिले सचिव व विश्व साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.प्रभाकर माचवे यांनी म्हटले आहे की, “मी त्यांना मायकोव्हस्की, ब्रेख्त, मढेकर, नझरूल यांच्या तोडीचा कवी मानतो. त्यांचा मार्क्सवाद- मानवतावाद एका प्रामाणिक मानवी व्यथेचा वेध घेणा-या व्यक्तीचा विश्वास आहे, नुसता पांघरलेला बुरखा नाही - की आग्रही प्रचारकी ‘जाहीरनामा' नाही. ते अमर शेख किंवा शिवमंगल सिंह ‘सुमन', सुकांत भट्टाचार्य किंवा श्री. श्री. प्रमाणे किंवा नागार्जुन किंवा 'जोश'सारखे ‘जनकवी' नाहीत. त्यांच्यात विंदांची बौद्धिकता किंवा विष्णु डे ची साफसफाई नाही. फैज' ची सूक्ष्मता नाही. पण एक विलक्षण अवघडपणा आहे."

 हे पुस्तक मुक्तिबोधांनी छोट्या छोट्या ३१ प्रकरणांत विभागले आहे. पूरक वाचनासाठी जरी ते लिहिले असले तरी त्यातील पुरावे, संदर्भ, घटना व्यक्तींच्या अनुषंगाने ऐतिहासिक तथ्य प्रमाण मानून ते लिहिले गेले आहे. इतिहास आणि संस्कृती या मानवी जीवनातील अशा दोन गोष्टी होत की त्यातील एक अपरिवर्तनीय असते, ती म्हणजे इतिहास, संस्कृती इतिहासातून जन्मते. ब-याचदा ती मुळात परिवर्तनशील असल्याने काळापासून जितकी दर जाईल तितकी ती इतिहासाशी फारकत घेत विकसित होत रहाते. मग वर्तमान पिढीस दोहोत सुसंगती लावणे कठीण होऊन जाते. म्हणून जगात सर्वत्र इतिहास आणि संस्कृती समन्वय, मीमांसा, चिकित्सा करताना संघर्ष, मतभेद, अटळ होऊन उभे राहातात. त्यामुळे ते या पुस्तकाच्या संदर्भात ते स्वाभाविकच म्हणावे लागेल.


१. धुक्यात झाकोळलेला मानवेतिहास

 मानववंश शास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की मानवाचा विकास माकडाचे विकसित रूप होय. लाखो वर्षांपासून उत्क्रांती घडत उन्नत मानववंश तयार झाला. सुमारे दहा एक हजार वर्षांपूर्वीचा भारत म्हणजे घनदाट जंगलवस्ती होती. मानव संस्कृती विकसित झाली तशी जंगल तोड झाली. आज अफगाणिस्तान, बलुचिस्तान, राजस्थान वृक्षहीन खरे, पण त्या काळी, कधीकाळी तिथे घनदाट जंगल होते, हे आज खरे नाही वाटत. पाषाण युग अवतरले आणि मनुष्य शिकारी झाला. तो मांसाहार करायचा, तसा फलाहारही. तो शाकाहारी झाला. शेती करायला लागल्यापासून शेतीनेच

साहित्य आणि संस्कृती/७७