पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/190

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकात्म भारताचा विचार


 भारत विकासकाळापासूनच बहुवंशीय, बहुसांस्कृतिक, बहुभाषी देश राहिला आहे. मध्ययुगापासून देश एकात्म व्हावा, असे प्रयत्न सुरू आहेत. संत काव्य त्याचे उदाहरण म्हणून सांगता येईल. युरोपात प्रबोधनापर्यंत एकात्मतेचा विचार प्रभावी झाला. तत्पूर्वी अॅरिस्टॉटल, प्लेटो प्रभृतींनी त्याचे तात्त्विक विवेचन केले असले, तरी ‘विश्वसाहित्य' हे एकात्मतेचे साधन होऊ शकते, हा विचार जर्मन कवी -नाटककार गटे यांनी अठराएकोणिसाव्या शतकात आग्रहाने मांडला. भारतात 'विश्वभारती' संकल्पनेद्वारे कवींद्र रवींद्रनाथ ठाकूर यांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात शिक्षणाद्वारे आंतरशास्त्रीय एकात्म अभ्यासाचा वस्तुपाठ सादर केला. त्यानंतर सुमारे पाच दशकांनंतर साने गुरुजींनी एकात्म भारतासाठी ‘आंतरभारती' विचार मांडला.

 साहित्याद्वारे एकात्म भारताचे प्रयत्न संत नामदेव, कबीरदास, गुरू नानक आदींपासून आपल्याकडे सुरू आहेत. हे लक्षात घेता, मराठीत महानुभाव पंथापासून ते पंडित-शाहिरी कवींपर्यंत हे प्रयत्न दिसून येतात. आधुनिक काळातही त्यात खंड पडलेला नाही. राष्ट्रीय चळवळीच्या काळात एकात्म झालेला भारत स्वातंत्र्योत्तर कालखंडाच्या प्रवासात मात्र शिथिल पडलेला दिसतो. त्याची मुख्य कारणे राजकीय असली, तरी जगात साहित्य, भाषा, संस्कृतीद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रयत्न झाले तसे आपणाकडे होताना दिसत नाहीत. भविष्यकाळात ते आपण करू शकू, तर भारत लवकर महासत्ता होऊ शकेल.

 भाषिक अंगाने विचार केला तर आर्य, द्रविड आणि पूर्वोत्तर भारतातील भाषा असे भारतीय भाषांचे त्रिखंडीय रूप आहे. स्वातंत्र्यानंतर आपण भाषेचे जे घटनात्मक धोरण अंगीकारले, त्यानुसार केंद्र स्तरावर हिंदी व इंग्रजी ही आपल्या शासकीय व्यवहाराची भाषा बनली. मूळ धोरण स्वातंत्र्यानंतरच्या

साहित्य आणि संस्कृती/१८९