पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/191

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रजासत्ताकाच्या पहिल्या १५ वर्षांत (सन १९६५) हिंदी सक्षम करण्याच्या नीतीचे होते. पण दरम्यानच्या काळात दक्षिण भारतीयांच्या भाषिक विरोधामुहे सन १९६५ पर्यंत हिंदी सक्षम न करता आल्याने पूर्वस्थिती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतरच्या काळात प्रशासन, न्याय, शिक्षण इत्यादी क्षेत्रांत इंग्रजी भाषेस प्रतिष्ठित मानण्याची उच्चशिक्षितांची मानसिकता, जगभरात इंग्रजीला असलेल्या संधी यामुळे शिक्षण व व्यवहारात इंग्रजीचे प्रस्थ निरंतर वाढत राहिले. जागतिकीकरणानंतरच्या काळात माहिती व तंत्रज्ञानाने इंग्रजी ही जगाची अघोषित ज्ञानभाषा झाली. उलटपक्षी हिंदी ही राष्ट्रभावनेवर वाढणे अपेक्षित होते, ते अनेक कारणांनी घडू शकले नाही, केंद्रीय आस्थापना व केंद्रीय प्रशासन भाषा म्हणून जरी आपण हिंदीचा विकास केला असता, तरी ते शक्य झाले असते. पण प्रत्येक कालखंडात राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी ते घडू शकले नाही.

 दुसरे असे की, भाषिक प्रसाराचे मोठे साधन व माध्यम असते शिक्षण, आपण स्वातंत्र्यानंतर त्रिभाषा सूत्र अंगीकारले, पण त्याचीही सक्षम अंमलबजावणी आपण केली नाही. परिणामी, देशात इंग्रजीचे प्रस्थ वाढले. जागतिकीकरण व माहिती तंत्रज्ञानामुळे सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाची सार्वत्रिक मानसिकता दिसून आल्यानेही प्रादेशिक व देशी भाषा शिक्षणाकडे नव्या पिढीचा कल कमी दिसत गेला. भाषिक विकासाचे आणखी एक महत्त्वाचे साधन असते साहित्य, स्वतंत्र भारतात भारतीय भाषांत आपापले साहित्य निर्माण होत राहिले. राष्ट्रीय साहित्यनिर्मितीच्या बाबतीत साहित्य अकादमीने ‘आंतरभारती' स्वरूपाचे कार्य भाषांतराद्वारे केले. भारतीय ज्ञानपीठाने भारतीय साहित्यास प्रतिष्ठित केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासानेही (एनबीटी) हे कार्य केले. पण त्यातून ‘भारतीय साहित्य' म्हणून काही खास वैशिष्ट भाषांत निर्माण झाली, असे घडले नाही. रवींद्रनाथ टागोर, शरच्चंद्र चटर्जी, प्रेमचंद, वि. स. खांडेकर, सुब्रमण्यम् भारती आदी कवी-साहित्यकार भारतीय म्हणून ओळखले गेले ते भाषांतराच्या जोरावर. विशेषतः महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणात भारतीय भाषा व साहित्याचे अध्ययन, समीक्षा, तुलनात्मक अभ्यासास आपण वाव न दिल्याने एका अर्थाने या देशाचा भाषिक अभ्यास (अध्ययन, अध्यापन, संशोधन, समीक्षा, भाषांतर, आकलन, संपादन, प्रकाशन इत्यादी) प्रांतीयच राहिला. स्वातंत्र्यानंतर प्रांतवादास वाढते महत्त्व मिळण्याची राजकीय कारणे जशी आहेत, तशीच शैक्षणिक अनास्था हेही त्याचे एक प्रमुख कारण होय.

साहित्य आणि संस्कृती/१९०