पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कुलगत, धर्मगत, संस्कारगत, विश्वासगत, शास्त्रगत, संप्रदायगत विशेषतांचे जाळे, जंगल हटवून असं आसन तयार करणे शक्य आहे की जिथे माणूस माणसास माणूस म्हणून भेटेल. जोपर्यंत हे घडणार नाही, होणार नाही तोवर अशांती, मारामारी, हिंसा, प्रतिस्पर्धा राहणारच. कबीरदासांनी माणुसकीची तपश्चर्या केली होती. तिचे बीजारोपण केलेले होते. त्याची निष्पत्ती काय झाली हे गौण. आधुनिक काळातील श्रेष्ठ कवी रवींद्रनाथ टागोर यांनी म्हणून ठेवलं आहे की, “मला हे पूर्णपणे माहीत आहे की जीवनात ज्या पूजा पूर्ण नाहीत झाल्या त्या काही व्यर्थ नव्हत्या. जी फुलं उमलण्यापूर्वीच जमिनीवर पडली, ज्या नद्या वाळवंटातून वाहता वाहता लुप्त झाल्या, आटल्या, मला माहीत आहे की ते सारं काही व्यर्थ नव्हतं. जीवनात आजही जे अपूर्ण आहे, अर्धमुर्धं मागं राहिलंय, मला माहीत आहे की तेही व्यर्थ नाही. माझं जे भविष्य आजही अस्पर्श आहे, ते तुमच्या मुखा, स्वरातून उमटतं. मला माहीत आहे की तेही अगदीच ना हरलेले आहे, ना हरवलेले."

 कबीरदासांची तपश्चर्याही अशीच. ना व्यर्थ, ना हरलेली, ना हरवलेली! त्यांचा दृढविश्वास होता की ईश्वर ज्यांच्या ज्यांच्या बरोबर आहे नि ज्यांचा त्याच्यावर विश्वास आहे त्याची ही तपश्चर्या करोडो वर्षे मागे गेली तरी व्यर्थ ठरणार नाही, त्याला विचलित करणार नाही-
 जा के मन विश्वास है, सदा गुरु है संग।

 कोटि काल झकझोरहीं, तऊन हो चित भंग।।


 • (टीप : हजारीप्रसाद द्विवेदी लिखित 'कबीर' ग्रंथातील ‘भारतीय धर्मसाधना में कबीर का स्थान' शीर्षक मूळ लेखाच्या संपादित भागाचे भाषांतर आहे.)

कबीर - हजारीप्रसाद द्विवेदी

राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली

प्रकाशन - चौदावी आवृत्ती (२०१४)

पृ. २८0 किंमत रु. ५00/-

■ ■

साहित्य आणि संस्कृती/१८३