पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/185

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सत्तेच्या वळचणीतील संस्कृती

विष्णू प्रभाकर


 आज अशी परिस्थिती नाही की आपण सत्ता आणि संस्कृतीमधील संबंधांबाबत काही निर्णयात्मक मत व्यक्त करू शकू. हे अशा कारणांमुळेही खरं आहे की आपण मूळ प्रश्नांना बगल देत व्यक्तिविषयक विश्लेषण करण्याची नको तितकी घाई करत असतो. या प्रश्नावर विचार करताना मग हे तर्क अकारण संदर्भहीन होऊन जातात. दुस-याला ‘विकाऊ' संबोधणारे स्वतः मात्र सवलतीच्या दरात खरीदले जाऊ शकतात किंवा अधिकांश लोक आपलं योगदान किंवा आपल्या सर्जनात्मक शक्तीपेक्षा नाटकी विरोधाने स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होताना दिसतात. किंवा सत्तेच्या तथाकथित हस्तक्षेपास विरोध करणारे चारित्र्यहनन, खळबळजनक आरोप, बिंग फोडणे इत्यादीसारख्या सवंग पद्धतीचा वापर करून जे हीन मार्ग अवलंबत असतात, त्यामागे कुटिल राजकारणाचे डावपेचच असतात.

 यातील प्रश्न व्यक्तिगत कमी असतो, पण सत्ता आणि संस्कृतीचा त्यातील रंग नेहमीच गडद राहात आला आहे. सत्तेची प्रवृत्ती आक्रमक आणि एकाधिकारी असते. सत्ता स्थायी नसली, तरी ती अशी असतेच मुळी. खरं तर ती नित्य परिवर्तनशील असते व स्थानांतरितही होत राहात असते. अशा स्थितीत तिच्या वळचणीतलं प्रशासन संधिसाधू, खरेदीविक्रीत तरबेज तर असतेच पण शिवाय ते अनेक प्रकारांनी शोषण करण्यात पटाईत असते. कथाकार शरत्चंद्र चटर्जीच्याच शब्दात सांगायचे तर 'माणसाकडून पशुवत काम करून घेण्यासाठी माणसाला पाळीव प्राणी कसे बनवायचे, उपकृत कसे करायचे हे सत्तेला चांगले माहीत असते. किंबहुना, मानवाचे मानवाशी असलेले संबंध एकाच वेळी सौहार्दपूर्ण असावेत अशी तिची दृष्टी असतच नाही मुळी."

साहित्य आणि संस्कृती/१८४