पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/183

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कबीर इतके करून थांबतील तर आगळेवेगळे कसे? जर ‘अल्लाह शब्द मुस्लीम धर्म प्रकट करणारा नि ‘राम' हिंदू धर्माचा असेल तर मी दोन्हीला नमस्कार करायला तयार आहे. असे कबीर म्हणत. अरबी, फारशी शब्द मुसलमानांचे, संस्कृत हिंदूचे म्हणून ते भाषाही संकरित, खिचडी वापरत. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या बाह्य आचरणास नकार देत मोठ्या धैर्याने कबीर भक्तिमार्गात प्रवेश करते झाले.

 एखादी गोष्ट नाकारणे काही मोठे नव्हे. प्रत्येक जण काही ना काही नाकारत असतोच. परंतु एखाद्या महान उद्देशापोटी निरुद्देश विद्रोह निरर्थक असतो. पण व्यापक हिताच्या निरपेक्ष विद्रोह शूराचा धर्म मानला जातो. त्यांनी मोठ्या धैर्याने आपल्या प्रेममार्गी भक्तिधारेचे विवेचन केले. रूढी नि वाईट संस्कारांविरुद्ध ते जन्मभर लढत राहिले. प्रलोभन, आघात, काम, क्रोध सारे अडथळे मार्गी वाट अडवत होते. पण त्यांनी निधड्या छातीने त्यांच्याशी मुकाबला केला. शेवटी कबीर जिंकले. ज्ञानाची तलवार हेच त्यांचं अमोघ शस्त्र होतं. त्या शस्त्राचा त्यांना अहर्निश वापर केला. ती निरंतर तळपत राहिली. दुसरीकडे प्रेम, चारित्र्यही त्यांनी जोपासलं. कुसंस्कार, कुरीती, कर्मकांड इ. बाह्याचारांना त्यांनी निकराने नाकारून नष्ट केलं. शिर हातावर घेऊन कबीर लढत राहिले. क्षणभर न ते थांबले, थकले, न निराश झाले. अजेय योद्ध्याप्रमाणे लढत राहिले.

 जे लोक कबीरदासांना हिंदू-मुस्लीम धर्माचे समन्वयकारी सुधारक मानतात. त्यांना नक्की काय हवं असतं ते कळत नाही. कबीराचा मार्ग स्पष्ट होता. ते दोन्ही धर्मांना त्यांच्या मूळ नि वर्तमान रूपात स्वीकार करून समन्वय करणारे खचितच नव्हते. ते क्रांतिकारी होते. समझोता करणे त्यांची वृत्ती नव्हती. एवढ्या मोठ्या जंजाळाला नष्ट करण्याची क्षमता सर्वसाधारण माणसात नसते. कमजोर, दुर्बल मनुष्य हे सहज करू शकत नसतो. ज्याला आपल्या ध्येयाबद्दल प्रचंड आत्मविश्वास असतो असा कबीरांसारखा साहसी मनुष्यच असे करू धजतो.

 कबीरांनी सर्व प्रकारच्या कर्मकांडांना झुगारून माणसाला सर्वसामान्य माणसाचं अभयपद बहाल केले नि ईश्वराला निरपेक्षवादाचं वरदान दिलं. त्याचा परिणाम काय होईल, भविष्यात त्याची काय गत होईल याची त्यांनी फिकीर केला नाही. यश हेच काही मोठेपणाची सदासर्वकाळ कसोटी नसते. आज कदाचित हे सत्य त्या सर्व निबीड अरण्यातून येईल आणि सांगेल की सर्वांच्या सर्व विशेषता तशाच ठेवून मानव मीलन अशक्य आहे. जातिगत,

साहित्य आणि संस्कृती/१८२