पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
अर्थ आणि काम

 ‘पश्चिम' खंडातील ‘अर्थ और काम' हे आणखी एक मुळातून वाचावे असे प्रकरण आहे. जैनेंद्रांनी असे म्हटले आहे की, “अर्थाचे (पैशाचे) मूळ कामभावनेत (Sex) दडलेले आहे.' (पृ. २०६). प्रयत्नांमागेही ते काम हीच प्रेरणा असल्याचे सांगतात. निष्कामताच धन-संपत्तीच्या प्रश्नांतून माणसास मुक्ती देऊ शकते. या सर्वांमागे अपरिग्रह मूल्य आहे. या प्रकरणात जैनेंद्रांनी आपली व प्रेमचंदांची दोन उदाहरणे नोंदली आहेत. दोघांना दोन प्रसंगात पैसे यायचे होते. ते आले अनपेक्षितपणे व गरजेपेक्षा कमी. पैशाचे मूल्य मुद्रेवर नोंदविलेले खरे की गरजेवर आधारित? असा सापेक्ष परंतु मार्मिक प्रश्न विचारून जैनेंद्र ‘किंमत' या अर्थशास्त्रीय संकल्पनेपुढे एक तात्त्विक प्रश्नचिन्ह उभं करतात नि वाचक दिग्मूढ होऊन जातो. ‘समय और हम' या ग्रंथाचे श्रेष्ठत्व तुम्हास दिग्मूढ करण्यात सामावलेले आहे, अशी वाचनांती झालेली माझी धारणा आहे. या प्रसंगात जैनेंद्रकुमार स्पष्ट करतात की, 'अर्थ स्वप्रतिष्ठित वस्तु नहीं है। वह इच्छा - आवश्यकता से जुड़ा है और सुखदुख देने की शक्ति उसे वहीं से मिलती है।" असे जीवन, व्यवहाराचे बिनतोड, सुसूत्र विवेचन या ग्रंथाचे खरे बलस्थान आहे. ज्यांना कुणाला माणूस, समाज, देश, संबंध जीवन असे सर्वांगी स्वरूप समजून घ्यायचे आहे, त्यांना हा ग्रंथ दीपस्तंभासारखा मार्गदर्शक बनून दिशादर्शन करत राहतो. काम म्हणजे स्त्री-पुरुष संबंध. ते लिंगाधारित नाही तर स्त्री-पुरुषांचे भोगी व भोग्य स्वरूप निश्चित करण्यावर अवलंबून आहेत. स्त्री दुय्यम राहते, कारण ती भोग्या असते. हे ‘भोग्य' पण तिला शोषित ठरवतं. कमावती स्त्री केवळ कमावती झाल्याने स्वतंत्र होत नाही. स्वतंत्र अस्तित्व निर्णय शक्ती व स्वातंत्र्य यातून तिचं स्वपण जपणे, जोपासणे, म्हणजे तिचा माणूस म्हणून स्वीकार करणे होय. पश्चिमेपेक्षा भारतीय स्त्रीमध्ये ते अधिक सन्मानित आहे. अर्थात यावर स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकते. इथे संदर्भ ‘स्व' महत्त्वाचा.

साहित्य आणि कला

 धर्म, अर्थ, काम तत्त्वांइतकेच जैनेंद्रकुमार साहित्य आणि कलेस जीवनात महत्वाचे मानतात. पाश्चात्त्वा संस्कृतीत माणूस जसा जीवनात आहे, तसाच तो साहित्य आणि कलेतही आढळतो. पाश्चात्त्य साहित्यात माणसाचं दुभंगलेपण प्रकर्षाने चित्रित झाले आहे. त्यात खोल अस्वस्थता आहे नि शोधाची अनिवार तहान, तेथील साहित्य, कला म्हणजे मानवाचा खरेपणाचा शोध.

साहित्य आणि संस्कृती/१५२