पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



पण हा शोध ते बाहेरून घेतात. 'आत्म'ची अनुपस्थिती त्यांच्या शोधास अपयशाचा शाप देते. भोगलोलुप जीवनास तहानेचा शाप असतो. ती न संपणारी. म्हणून तिथे अपराध, पाप, घृणा, कुत्सित, दारू, नशा, व्यभिचार, बुद्धीचा अहंकार, विलास सर्वत्र आढळतो. सीमारेषा पुसट झाल्या की हे अटळ असते. घराचेच पहा ना. घर दिवाणखाना, शयन कक्ष, स्वयंपाकघर, प्रसाधन गृह सर्वांनी बनते. प्रसाधनगृह नसेल तर सारे घरच घाणीचे साम्राज्य बनेल. प्रत्येकाचे महत्त्व, प्रमाण, स्थान निश्चिती हे मानवी जीवनाचे सौंदर्य! घरात पुढे दिवाणखाना नि मागे परस (बँक यार्ड) असतो. परसबाग मागेच हवी. ती प्रदर्शनीय वस्तू नव्हे! समोरची हिरवळ, बाग प्रशस्त म्हणून प्रदर्शनीय. माणसांच्या भाव, वृत्तींचंही असंच आहे. शयनगृहाचे व्यवहार तुम्ही चौक, बाजार, स्टेशन, जिने कुठेही करू लागाल म्हणून का आधुनिक होणार? संयम, सभ्यता म्हणजे सौंदर्य ? आस्वाद नि उन्मानात अंतर नाही का? त्याचा विवेक पाळण्यातच प्राणी व माणसातले अंतर सामावलेलं आहे ना? अश्लील, बीभत्स, कुत्सित, अधम हेय कां? साहित्याचे श्रेय नि प्रेय समजून घेतल्याशिवाय जीवनातील हेय समजत नसतं. म्हणून साहित्य, कलेचे माणसाच्या जीवनातलं स्थान उच्च! तेच जर तुम्ही शरीरी करून टाकला तर मग समाधान कुठून येणार? बिटल्स, हिप्पी, समलिंगी, नग्न समाज असमाधानाची निर्मिती! ऋषि, मुनी, शिक्षक, साहित्यकार, कलाकार, विचारक अनुकरणीय, कारण ते संस्कृतीरक्षक व संवर्धक!

माक्र्स आणि शेक्सपिअर

 कार्ल मार्क्स नि शेक्सपिअर मोठे खरे! पण त्यांच्या मर्यादाही समजून घेतल्या पाहिजेत. पूर्वेतील साहित्य, कला, संस्कृतीत तुम्हाला वरील तहान आढळणार नाही. ती आहे पण नेपथ्यात. रंगमंचावर नाही. ‘रहना' आणि ‘जीना' यातले अंतर समजून घेणे म्हणजे सार्थक जगणे असे जैनेंद्र कुमार मानतात. दुःखातील ज्ञानाचा शोध नि पापातील आत्मबोध दोन्ही महत्त्वाचे. प्राच्य साहित्यातील क्रौंचवध, कांचनमृग, ययाती अपवाद! कर्ण, भगीरथ, राम आदर्श का? याचं उत्तर शोधत असताना मार्क्सची तात्कालिकता लक्षात येते. एकदा हिंदी साहित्यात यशपाल आणि जैनेंद्र यांच्यात मार्क्सवाद आणि गांधीवादावर जोरदार मतभेद झाले. जैनेंद्र म्हणाले होते की मतभेद म्हणजे विग्रह नाही. तीच गोष्ट शेक्सपिअरची. शेक्सपिअरमध्ये जैनेंद्रांना अस्वस्थता (कुरेद) आढळत नाही. आंतरिक अस्वस्थता, बेचैनी हा अभिजात साहित्याचा पाया नि आत्मा खरा. तो शेक्सपियरमध्ये आढळत नाही असे

साहित्य आणि संस्कृती/१५३