पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नावे सांगता येतील. पैकी ज्ञानेश्वर तर भारतीय प्रज्ञापुत्रांपैकी एक होत. त्यांच्या रसाई वाणीने ज्ञान आणि भक्ती, योग आणि प्रेमाची अजस्त्र धारा विशाल जनसमुदायात प्रवाहित होत राहिली होती. महाराष्ट्रातील संत तुकारामांचे अभंग वाचून आजही तिथला सामान्य माणूस आपले मन पवित्र झाल्याचा अनुभव आस्वादत मानव प्रेमात बुडून जातो. नरसी मेहतांची वाणी आजही गुजरातच्या झोपडी-झोपडीत गुंजत असते. असा भारतीय शोधूनही सापडणार नाही ज्याचं मन मीरेची पद ऐकून विकल नाही झाले. जरी ती राजाराणी असली, तरी तिची शब्दकळा सर्वसामान्यांची असायची. ‘गिरिधर के आगे नाचूँगी' म्हणणारी संत मीराबाई युगे युगे भारतीयांच्या हृदयाला प्रेमाने आकंठ स्नान घालत राहील. चंडीदासांची दुःखपूर्ण भक्तिपदे आजही बंगाली जनतेचे डोळे साश्रू होत भक्तीत लीन होत राहात असतात. हृदयाला पाझर फोडणारी, भक्तांचे साश्रू नयन नित्यनत करणारी अशी भक्तिधारा भारत सोडता अन्य देशांत आढळणे अशक्यप्राय! सूरदास, तुलसीदास, रसखान, जायसी तर त्या काळची ज्वलंत नक्षत्रेच होती.

 कबीराचे कवित्व हा केवळ साहित्यिक महत्त्वाचा विषय नसून त्याचे ऐतिहासिक स्थान अक्षुण्ण असे आहे. निर्भय, स्पष्टवादी, निष्पक्ष, भीडभाड न ठेवणारा कबीर स्वतः मात्र मानवी प्रेमाचा न आटणारा झरा होता. त्यांचे दोहे आपल्यात प्राणाहुती देण्याची ऊर्जा निर्माण करतात. नानक वाणी म्हणजे ईश्वरीय प्रेरणा, ती आपल्यात ज्ञानप्रकाश तेवत ठेवते नि भावनेचा ओलावा जागवते. रोहिदासाच्या विनम्र हृदयात सर्वजण ओलेचिंब होऊन जातात. सेना असो की पलटू ईश्वरीय आभा धारण करत ते प्रेषित होऊन अवतरतात. परंतु त्यांची वृत्ती न अलौकिक होती न राहणीमान! पलटूचे राहणे तर इतके साधे होतं की जर चुकून तो आपल्या घराच्या ओसरीवर आला तर त्याचा अवतार पाहून आपण कदाचित त्याला हाकलून देऊ.

 त्यामुळेच असेल कदाचित त्या काळात ईश्वरीय रूपाचं वर्णन ‘दरिद्री नारायण' असे केले जायचे. लोकांना वाटायचे की अशा अनवाणी, अकिंचन रूपातच ईश्वर अवतरत असतो.

 दिल्ली राजवटीतील अनेक राजकीय घटना अनुभवून लोक निराश, उदास होत. परंतु भारतीय प्रतिभांनी, प्रज्ञापुत्रांनी तत्कालीन राजकीय कारकिर्दीकडे लक्ष ठेवले असते तर अशी दुर्दशा झाली नसती. भारतीय धर्मापुढे इतकी आव्हाने उभारली नसती तर कदाचित त्या काळचा अजस्त्र विकास, इतक्या उलथापालथी घडल्या नसत्या. त्या आठवल्या की वर्तमान

साहित्य आणि संस्कृती/१३२