पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इस्लामी तत्त्वज्ञान, साहित्य यांचं ते प्रमुख केंद्र होते. तेथील राजा इब्राहिम शर्डीचे या संदर्भातील योगदान अविस्मरणीय होतं.

 असे, असले तरी त्या वेळच्या बंगालच्या मुस्लीम दरबारांनी आपली वेगळी ओळख जनमानसात रूढ केली होती. त्या दरबारात बंगाली भाषेचा सन्मान केला जायचा. बंगाली विद्वानांना राजाश्रय मिळायचा. बंगाली सुलतानांनी 'रामायण', 'महाभारत'सारख्या संस्कृत ग्रंथांची बंगाली भाषांतरे घडवून आणण्यासाठी अनेक पंडितांना राजदरबाराच्या सेवेत सामावून घेतलेले होते. बंगालच्या गौड प्रांताचा सुलतान नसरत शहाने महाभारताचा बंगाली अनुवाद करून घेतला होता. बंगालचे प्रसिद्ध कवी कृत्तिवासला बंगालच्या सुलतानाने आपल्या राजदरबारात नियुक्त केले होते. मलधर बसू या बंगाली कवीने अनेक गीतांची बंगाली भाषांतरे केल्याचे दिसून येते. त्या कवीस सुलतान हुसेन शहाने आपल्या दरबारात आश्रय दिला होता. बंगालच्या मुस्लीम राजदरबाराने बंगाली भाषेच्या विकासासाठी जे काही करणे शक्य होते, ते सारे केले होते.

 दक्षिणेकडील विजयनगर साम्राज्याचा अधिपती कृष्णदेवराय स्वतः कवी होता. त्याने तेलुगू भाषा, साहित्याचं सुवर्णयुग निर्माण केले. त्याच्या राजदरबाराच्या प्रोत्साहनामुळेच तेलुगूचा चतुर्दिक विकास झाला.

 राजदरबाराच्या आश्रयामुळेच खडीबोली हिंदीपासून उर्दूचा जन्म शक्य झाला. हिंदी आणि उर्दू दोन्ही भाषा त्या काळात दक्षिणी (दकनी) नावाने ओळखल्या जायच्या. त्यांना दक्षिणी राज्यांचे पाठबळ लाभल्यानेच त्या विकसित होऊ शकल्या. तिला बाळसे धरल्यावरच ती (दख्खिनी) उत्तरेत जाऊन स्थिरावली.

 तत्कालीन राजे नि सुलतान आपल्या दरबारी प्रकांड पंडित, कवींच्या सहवासाने सुखावत नि स्वतः गौरवान्वित झाल्याची प्रचिती त्यांना येत असे. वस्तुस्थिती मात्र अशी होती की साहित्याचे उत्कर्ष केंद्र ख-या अर्थाने जनतेत होतं. प्रतिभावंत जन्मतः सर्वसाधारण घरात, जनतेत. शिक्षित-अशिक्षित दीन-दलित समजल्या जाणा-या जनतेत ते जन्मत. त्यांचे जीवन हे एखाद्या उत्स्फूर्त आंदोलनासारखं असायचं. त्यांच्यातूनच भक्ती आंदोलनाची धारा उगम पावली. साधू, संत, फकीर, प्रगल्भ ज्ञानींच्या सत्संगाने या जनतेच्या मनात ज्ञान नि प्रेमाची अजस्त्र धारा, प्रवाह निर्माण होत होता. अशा प्रतिभासंपन्न सुपुत्रांत कबीर, नामदेव, रोहिदास, पलटू, नानक, दादूदयाल, तुकाराम, नरसिंह मेहता, चंडिदास, ज्ञानेश्वरसारख्या कितीतरी प्रज्ञापुत्रांची

साहित्य आणि संस्कृती/१३१