पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आधुनिक युग त्यापुढे फिके पडते. अन् लक्षात येते की कदाचित त्यामुळेच भारतीय धर्मापुढे हृदयाची आर्द्रता, मानव-प्रेम, जीवनप्रकाश सामावलेला आढळतो. रूढीग्रस्त नि भेदांनी घेरलेला भारतीय माणूस ईश्वराच्या समोर आला की म्हणूनच भेदातीत होऊन जातो. इस्लामचे भारतीयीकरण नि हिंदू धर्माचे इस्लाम प्रभावी रूप या एकमेकांचीच प्रतिबिंबे होत.

 राजसभांतून निर्माण झालेल्या साहित्यात पांडित्य प्रचुरता, अलंकार प्रियता आणि विलासी वृत्ती दिसून येते. या विरुद्ध सर्वसामान्यांच्या झोपडीत जे काव्य जन्मले ते मात्र छंदमुक्त होते. त्यात काव्यातले जीवन वास्तविक आहे, त्यात सरळ, थेट प्रहार करण्याचे सामर्थ्य आहे. त्या नवोन्मेषी पुकारा आहे, संघर्षशील आक्रोश आणि घर्षणशील आव्हानेही त्यात पुरून उरली आहेत. त्या साहित्यात असलेली माता-बालकांची कारत-करुणा हृदय पिळवटून टाकते. तसेच त्यात एक कृतज्ञ प्रेमही सामावलेले आहे. त्यामुळे आधुनिक काळात ईश्वर भक्तीचा महिमा नसला म्हणून फार काही बिघडेल असे नाही पण त्या साहित्यात थोडीशी हार्दिकता, संवेदना असायला हवी जी आपलं जीवन सुसह्य, आर्द्र, आल्हाददायक नि सरस करेल.

 त्या काळात संगीत, चित्रकला, वास्तुशास्त्राने विकासाची नवी शिखरे पार केली होती. मोठमोठ्या किल्ल्यांच्या कमानींना या नवकलेमुळे नाजूक नजाकत निर्माण झाली होती. संगीत क्षेत्रात नवी रागदारी निर्माण झाली. कलेला भव्यतेबरोबर कोमलतेचा स्पर्श लाभला. मुसलमानांनी या कलेत आत्मीयता ओतून तिच्यात नव रसांची निर्मिती केली. संगीत कधी हिंद, मुसलमान असतं का? कलेत असा भेद करणे कठीण असते, कारण ती माणसाच्या हृदयाचा सहजोद्गार असते. कलेतून निर्माण होणा-या हास्यास अथवा अश्रूस हिंदू-मुसलमान कसे मानता येणार? मुस्लीम अश्रू, हिंदू हास्य असे कधी असते काय? का नाही? तर कला ही कोण्या हिंदू सरदाराने वा मुस्लीम सुलतानाने निर्माण केलेली नसते. ती जन्मते जनतेतील सर्वसामान्य म्हणून जन्मलेल्या कलाकारातून. कारण ती आपल्या जनतेची सहज अपत्ये होती. म्हणून तर त्यांच्या हृदयात सहज आल्हाददायकता, मानवी एकता, भेदातीतता उपजत होती. त्या काळचे हे योगदान आजच्यापेक्षा काय वेगळं होते? कोणती कमतरता होती का त्यात? ती आजच्यापेक्षा श्रेष्ठ व अमर कला होती. कारण ती काळाच्या विकराळ कसोटीवर तावून-सुलाखून खरी म्हणून जन्मलेली होती. ती अस्सल होती.

साहित्य आणि संस्कृती/१३३