पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ओजस्वी वर्णन आहे. याच परंपरेतलं ‘बिसलदेव रासो' काव्यही उल्लेखनीय मानले जाते.

 राजदरबारी कवीत विद्यापतीचे स्थान सर्वोच्च होते. ते मैथिली भाषेचे राजकवी मानले जातात. त्यांनी मिथिला भाषेत सुंदर शृंगाररसपूर्ण काव्यं लिहिली आहेत. मिथिलेचा राजा शिवसिंह आपल्या दरबारात संस्कृत भाषेसही प्रोत्साहन द्यायचा. त्याच्या राजदरबारातील वाचस्पती मिश्रसारख्या पंडितांनी अनेक संस्कृत काव्यं रचली होती. मिथिला राजसभेने संस्कृतला आपल्या दरबारात मानाचे स्थान देऊन मोठे पाठबळ दिले होते.

 खिलजी आणि तुघलक घराण्याची सत्ता दिल्लीवर असण्याच्या कालखंडात दिल्ली दरबाराने अमीर खुसरोसारख्या कवीला आश्रय दिला होता. या दरबारात पर्शियन भाषेस प्रथमच भारतीय राजकारभारात स्थान मिळाले. तत्कालीन मुस्लीम शासक भारतीय ज्ञान-विज्ञान, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, चिकित्सा शास्त्र, ज्योतिर्विद्येने विशेष प्रभावित झाले होते. महंमद तुघलक स्वतः प्रकांड पंडित होताच, पण तो मोठा जिज्ञासू असल्याचे सांगितले जायचं. तो आपल्या काळातील प्रकांड पंडित, मनीषी मानला जायचा. त्यांच्या दरबारात तत्त्वज्ञान, अन्य ज्ञान-विज्ञानविषयक चर्चा विद्वानांच्या उपस्थितीत होत राहायच्या. वेडा समजला जाणारा महंमद तुघलक मात्र या चर्चेमध्ये सहभागी होत राहायचा हे विशेष.

 त्याचा उत्तराधिकारी म्हणून गादीवर आलेला फिरोज तुघलकाने भारतीय तत्त्वज्ञान, ज्योतिष, तसेच अन्य अनेक विषयांवरील ग्रंथांची भाषांतरे करून घेतली होती. सिकंदर लोदीच्या काळात त्याने भारतातील अनेक आयुर्वेदासंबंधी, ग्रंथांची भाषांतरे करवून घेतली होती. खिलजी आणि तुघलक घराण्याच्या राजदरबारातील कवी अमीर खुसरो ज्याचा यापूर्वी उल्लेख करण्यात आला आहे, तो बहुमुखी प्रतिभेचा कवी पर्शियन भाषेचा चांगला जाणकार, विद्वान, संगीततज्ज्ञ तसेच जिज्ञासू, ज्ञानपिपासू होता. अमीर खुसरोने ब्रज आणि खडीबोलीसारख्या भाषांत उत्तमोत्तम काव्यरचना केल्या होत्या. त्याची कोडी, रुखवतं, मुकरे प्रसिद्ध आहेत. तो जन्मतः मुसलमान असला तरी हिंदू ज्ञान, संस्कृती, भाषा, तत्त्वज्ञान, संगीताचा जाणकार, निसर्गप्रेमी व प्रशंसक होता. त्याची ब्रजभाषा लालित्यपूर्ण होती.

 जौनपूरचे स्वतंत्र प्रांतिक मुस्लीम राज्य विद्वानांसाठी तर हक्काचे आश्रयस्थान होते. तिथे विद्वानांचा मानसन्मान प्रतिष्ठा वाढवणारा असायचा. जौनपूर साम्राज्याची दरबारी भाषा पर्शियन असली, तरी अरबी पांडित्य,

साहित्य आणि संस्कृती/१३०