पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अफगाणिस्तान, बलुचिस्तान, बल्खपर्यंतचा प्रदेश हा भारतात समाविष्ट होता, तिथे भारतीय संस्कृती नांदत होती. कनिष्क आपल्या नाण्यांवर, मुद्रांवर ‘शाहनुशाहि' अर्थात शहंशाह अशी बिरुदावली कोरत असे. हे लेखन इराणी असलं, तरी त्याची विभक्ती संस्कृत असायची. त्याचप्रमाणे महंमद गझनीने आणि त्याच्यानंतर त्याच्या उत्तराधिकारी राजांनीही आपल्या मुद्रांवर इस्लामी संदेशांचे संस्कृत भाषांतर कोरलेले आढळते. महंमद गझनीच्या दरबारात अनेक भारतीय विद्वानांना आश्रय दिला गेला होता. गजनी आणि त्याच्यापुढे दूरवर असलेल्या उत्तर पश्चिमेकडील अनेक राज्यांवर ब्राह्मणांचे राज्य होते. पुढे या ब्राह्मणांनी इस्लाम धर्म स्वीकारला ही गोष्ट अलाहिदा. असेही काही लोक त्या काळात होते की धर्मांतर न करता, ते आपला धर्म नि जात टिकवून धरून जगत राहिले. ज्यांनी धर्मांतर केले नव्हते त्यापैकी अनेक धर्मांतरितांच्या चाकरीत होते. पूर्वपरांचा प्रभाव असा असतो की तो एका रात्रीत संपतही नसतो नि सोडताही येत नसतो. महंमद घोरीच्या दरबारातील प्राकृत-अपभ्रंश कवी केशवदास बहुधा अशांपैकीच एक असावा.

 प्रत्यक्षात हे सर्व आश्रित कवी असत. काहींत प्रखर प्रतिभा असायची तर काही सुमार कवींचाही भरणा असायचा. हिंदी साहित्य इतिहासाच्या पूर्व मध्यकालीन कालखंडात दरबारी आश्रित कवी (चारणकवी) नी लिहिलेले विपुल काव्य आढळते. हे काव्य वीरगाथा काव्य म्हणून ओळखले जाते. या सर्व कवींनी वर्णनपर काव्यांची रचना केल्याचे दिसून येते. पृथ्वीराज चौहानचा समकालीन राजा जयचंद राठोडच्या दरबारात विद्याधर नामक कवी होता. त्याने जयचंदाच्या पराक्रमांचे वर्णन आपल्या काव्यात केले होते असे सांगितले जाते. परंतु हा काव्यग्रंथ मात्र आज अनुपलब्ध आहे. 'पृथ्वीराज रासो' ही वीरगाथा पुढे दीर्घकाळ त्याच्या प्रशंसकांत प्रिय राहिली. त्या काव्यात वेळोवेळी प्रशंसक कवींनी भर घातल्याचे सांगितले जाते. परिणामी आज ‘पृथ्वीराज रासो' काव्यग्रंथाची प्रत उपलब्ध आहे, ती मौलिक (मूळ) मानली जात नाही. कारण ते प्रक्षिप्त काव्य समजलं जातं. कवी जगनिक कृत ‘आल्हा खंड' काव्य हे प्रबंध काव्य आहे. ते कविता नि गीत यामधील काव्यप्रकाराचा नमुना म्हणून पाहिले, अभ्यासले जाते. या काव्याचीही जी प्रत आज उपलब्ध आहे, ती प्रक्षिप्त मानली जाते. ती मूळबरहुकूम नाही. नंतरच्या भर घालणाच्या कवींनी तर त्याची भाषाच बदलून टाकल्याचे सांगितले जाते. शारंगधर कवी कृत ‘हम्मीर रासो' असंच प्रसिद्ध वीरकाव्य आहे. त्यात राज हमीर आणि अल्लाउद्दीन खिलजीमध्ये झालेल्या महासंग्रामाचे

साहित्य आणि संस्कृती/१२९