पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केलं जायचं. युद्धकैद्यांना गुलाम बनवायचा रिवाज होता. स्त्रियांनाही गुलाम, दासी बनवलं जायचं. सुंदर दासींचे मोल अधिक असायचे.

 मुसलमानांच्या या गुलाम प्रथेचं अनुकरण हिंदू सामंत करीत. राजस्थानच्या राजमहालात ही प्रथा आजही आढळते. तिथे आजही अमीर, उमराव, सरदारांमध्ये हुंड्याच्या रूपात दासी देण्याचा प्रघात आहे. मध्ययुग पूर्व काळातील वाईट चालीरीती आजही हिंदू समाजात दिसून येतात. पर्दा प्रथा हे त्याचं मार्मिक उदाहरण होय. जीवनाची असुरक्षितता, भविष्याची अशाश्वती असतानाही बालविवाह प्रथा चालू आहे.


साहित्य


 या युगातील सांस्कृतिक क्षेत्रातील दोन ठळक घटना म्हणजे १) भक्ती आंदोलनाचा उगम आणि विकास २) देशी भाषांचा विकास नि त्यांच्या साहित्याचा उत्कर्ष. या सर्वांची इथे तपशीलवार चर्चा अशक्य आहे.

 साहित्य विकास तीन केंद्रातून झाला - १) राज दरबार (हिंदू मुसलमान) २) जनता ३) व्यक्तिगत

राजदरबारातील साहित्य विकास

 राजदरबारात साहित्यिक नि विद्वान यांचे मानाचे स्थान असणे हे आशियाई संस्कृतीचं व्यवच्छेदक लक्षण होतं. मग इराणचा राजदरबार असो की बगदादचा, राजसभेची शोभा सरदार-दरकदारांशिवाय ती साहित्यकार नि विद्वानांच्या उपस्थितीनेच ती वाढायची. आपल्या भारतातही हाच प्रघात होता. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही की विदेशी विजेता मुहम्मद घोरीच्या दरबारात केशवदास नामक हिंदी कवी होता अशी नोंद हिंदीचे प्रकांड पंडित डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी यांनी करून ठेवली आहे. बहधा तो दरबारातील भाट कवी (प्रशंसक) होता. पृथ्वीराव चौहानच्या अजमेर नि दिल्लीच्या दरबारात त्याचा जिवलग मित्र चंदबरदाईला राजकवीचा बहुमान होता. त्या कवीने पृथ्वीराव चौहानवर लिहिलेल्या ‘पृथ्वीराज रासो महाकाव्यात प्रेम, शृंगार, वीरता, उद्यान, प्रासाद इत्यादीचे मनोरम वर्णन आहे. पृथ्वीराज बरोबर त्याचा शत्रू असलेल्या मुहम्मद घोरीच्या दरबारातही कवी असण्यातून मध्ययुगीन ही परंपरा अधोरेखित होते. आज आपणाला हे। विचित्र वाटणं स्वाभाविक आहे, कारण आपले जीवनच बदलून गेलंय. परंतु जर आपण ऐतिहासिक सत्य शोधू लागलो तर आपणास दिसून येईल की

साहित्य आणि संस्कृती/१२८