पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 प्रस्तुत निबंधातील उर्वरित अंश म्हणजे वेदांचे विवरण होय. द्विरुक्ती भयापोटी मी ते इथे देत नाही, त्याचं कारण वेदांची सर्वसाधारण माहिती ही सर्वश्रुत आहे.

 प्रस्तुत लेखाचा उद्देश आचार्य हजारीप्रसादांच्या साहित्य संपदेतील भारतीय संस्कृतीविषयक आकलन निवेदन करणे व त्या अनुषंगाने भारतीय संस्कृतीच्या विविधांगांची आचार्यांनी केलेली मीमांसा स्पष्ट करणे आहे. हजारीप्रसाद द्विवेदी भारतीय संस्कृतीचे द्रष्टे समीक्षक होत. या निबंधांमधून त्यांचा साहित्य, भाषा, कला, संस्कृती, इतिहास, ज्योतिष, वास्तुकला, प्राचीन ग्रंथ, मानववंशशास्त्र इ. विषयीचे वाचन व व्यासंग लक्षात येतो, तो स्तिमित करणारा आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते प्राचीनतेकडे पोथीनिष्ठ पद्धतीने पाहात नाही तर मानव कल्याणाचे अंतिम साधन व विश्व संस्कृतीची निर्मिती म्हणून या सर्वांकडे ते आस्थेवाईकपणे पाहतात. शिवाय ‘मनुष्यता केंद्री ठेवून ते सारी मीमांसा करतात. मनुष्यता की निरंतर प्रवाहमान धारा, नाना मूल्यों से शक्तिसंग्रह करती हुई आगे बढ़ती आ रही है। (विचारप्रवाह पृ. १७४) सारख्या सकारात्मक विचारावर त्यांची असलेली श्रद्धा मला लाख मोलाची वाटते. दुसरे असे की समग्र विवेचनात ते मनुष्य चरित्रास व मूल्यांना असाधारण महत्त्व देताना दिसतात. साहित्यास ते माणूस घडणीचे सूत्र म्हणून मांडतात, हेही विशेष होय. मानवतावादी चिंतक म्हणून या निबंधांतून उभी राहणारी प्रतिमाही अधिक आश्वासक आहे. संस्कृतीकडे समाज वास्तव म्हणून वस्तुनिष्ठपणे पाहणारा हा विचारवंत तुम्हाला देश आणि परंपरांकडे पाहण्याची जात, धर्मनिरपेक्ष दृष्टी देतो, म्हणून त्यांचे विचार शब्दशः एकदा वाचायला हवेत. ज्यांना आपली समज अभिनिवेश मुक्ततेने रुंदावायची असेल त्यांना आचार्य हजारी प्रसाद द्विवेदींचं लेखन एक अनुकरणीय वस्तुपाठ म्हणून पाहता येईल.


 टीप : वरील लेख आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी यांच्या संस्कृती विषयक निबंधांच्या आधारे त्यांच्या संस्कृती चिंतनाचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने लिहिलेला आहे. या विषयावर त्यांचा स्वतंत्र ग्रंथ नसला, तरी स्फुट निबंध ग्रंथांइतकेच महत्त्वाचे होत. संदर्भित निबंध संग्रह - १) अशोक के फूल २) कल्पलता ३) विचार और वितर्क ४) कुटज.

■ ■

साहित्य आणि संस्कृती/११६