पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मध्ययुगीन सांस्कृतिक विकास आणि सामंजस्य

गजानन माधव मुक्तिबोध


 प्रारंभीच्या शतकामध्ये मुस्लीम धर्मविचार एक तत्त्व म्हणून विदेशीच होता, परंतु हळूहळू त्याचे भारतीयकरण होत गेले. एकीकडे संकुचित मनोवृत्ती तर दुसरीकडे उदारमतवादी प्रवृत्ती या दोहोंमधील संघर्षात उदारवादी आदान प्रदानाचीच सरशी होत गेली. इस्लामी विचारांच्या संपर्क आणि संस्पर्शामुळे जनजागृती घडून आली. भक्ती आंदोलन देशभर पसरले. प्रगल्भ, समजदार संतांनी सर्वसामान्य मानवधर्म रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मागासवर्गीय समाजात महान संत, साधू आणि कवी उदयाला आले. ते मुस्लीम आणि हिंदू - दोन्ही समाजातील सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान बनले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच, मागासवर्गीय समाजास प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांनी तत्कालीन सांस्कृतिक, सामाजिक समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले. हिंदू-मुसलमान एकमेकांच्या जवळ आले. प्रांतिक मुस्लीम शासकांनी वेळोवेळी या एकता आंदोलनात समन्वयकाची भूमिका निभावली, वठवली. अत्युच्च मानवीय एकतेच्या भावनेचे पारडे जड झाले. तिने जातीधर्माच्या भिंती पाडल्या. भारताच्या या आध्यात्मिक मानवी समन्वय युगाने अनेक महापुरुषांना जन्म दिला.


* इस्लामचा भारतीय संस्कृती संपर्क आणि तत्कालीन प्रश्न


 विदेशी मुस्लीम आक्रमक भारतात स्थायिक होण्याच्या इराद्याने आले होते. प्रारंभीच्या काळात ते विदेशीच होते. मग कालौघात मुस्लीम प्रशासनात भारतीयांचा चंचुप्रवेश झाला. अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारातील मलिक काफूर हा मुसलमान भारतीयच होता. गुजरातचा सुलतान धर्मांतरित मुसलमान

साहित्य आणि संस्कृती/११७