पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धूळ झटकणे होय. माणूस नित्य संशोधन, अभ्यास करत असल्याने कोणतेही ज्ञान वा सिद्धांत अंतिम असत नाहीत, हेच खरे.


भारतीय संस्कृतीचे मूलस्त्रोत : वेद


 ‘कुटज' निबंध संग्रहातील ‘भारतीय संस्कृति के मूलस्रोत : वेद' हा निबंध यापूर्वी चर्चिलेल्या हिंदू संस्कृती के अध्ययन के उपादान'प्रमाणेच वर्णनात्मक वा माहितीपर होय. असं असलं तरी आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी माहितीचं जे विश्लेषण करतात, जे पुरावे देतात, ते मात्र विचारणीय असतं खरे. आता या निबंधाचेच पहा ना. रोजच्या व्यवहारात हे उभय शब्द स्थूलरूपाने आपणास एकच वाटल्याने आपण समानार्थी म्हणून वापरतो. त्यातील फरक स्पष्ट करत आचार्य सांगतात की मूढ' म्हणजे समजून उमजून चुकीच्या गोष्टी ग्रहण करणारा वा आचरणारा. तर 'मूर्ख' म्हणजे अजाणतेपणी चुकीची गोष्ट करणारा. राजा दिलीपचे उदाहरण देऊन द्विवेदींनी समजावले आहे की तो ‘विचार मूढ राजा' होता. गायीसाठी जीव देतो हे माहीत असून त्याग करणारा. त्याला विवेकही माहीत नव्हता नि वैराग्यही.

 'वेद' माणसाला काही शिकवत असतील तर ‘सत्’ आणि ‘असत्' मधील फरक. योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य साहित्य देत असते. म्हणून त्याचं वाचन, मनन करायचे. ते द्वंद्व दाखवते नि निर्णय शिकवते. मन निर्मळ ठेवून शुद्ध निर्णयाचे बळ साहित्य देते. प्राचीन साहित्यातील बोधकथा, पात्रे, मिथके ही सर्व या दृष्टीने महत्त्वाची. वेद म्हणजे अशा गोष्टींचा संग्रह, खजिना. दृष्टांत संग्रह म्हणून त्यांचे महत्त्व असाधारण. माणूस छोट्या छोट्या प्रलोभनांना बळी पडतो, कारण त्याला व्यापक, उन्नत माहीत नसते म्हणून. वेदांमध्ये ते सामर्थ्य पुरेपूर भरलेलं आहे. जे अनुचित आहे, त्याची जाण

आपणास साहित्य देते. वैराग्य व स्मशान वैराग्यातला फरकही ते सांगतं, समजावतं म्हणून वाचायचे. वेद म्हणजे आस्तिक तत्त्वज्ञानाचे ग्रंथ होत. 'वेद' शब्दातला अर्थच मुळी ज्ञान आहे, हे फार कमी लोक जाणत असावेत. वेदांमुळे भारतीय सांस्कृतिक परंपरेचे भान येते. प्रो. विंटरनित्सनी वेदांचे वर्णन 'Whole Great Literature' असे केले आहे, ते वेदांच्या व्यापक आशयाचे निदर्शक आहे. एका ठिकाणी वेदांचा उल्लेख 'Family Sagas' केल्याचेही मला आठवते. त्याचा उल्लेख या निबंधात आचार्यांनी 'Family Books' असा केला आहे. वेद अपौरुषेय आहेत, याचा अर्थ इतकाच की त्याचा रचयिता अज्ञात आहे. ऋषींनी पठणाने ते जपले इतकेच.

साहित्य आणि संस्कृती/११५