पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करणे क्रमप्राप्त आहे. त्याशिवाय भारतीय संस्कृतीचा उगम आणि विकास आपणास समजणार नाही.

 भारतीय संस्कृती ख-या अर्थाने उजेडात आली ती मोहन-जो-दडो नि हडप्पा संस्कृतीच्या उत्खननातून. गंमत म्हणजे रामायण, महाभारताविषयी जे संशोधन झाले आहे त्यातून रावणाविषयी जी माहिती मिळते ती सर्वथा नवी तर आहेच, शिवाय ती रावणाच्या पारंपरिक प्रतिमेस छेद देणारी आहे. म्हणजे असे की "रावण हा मोठा शैव साधक होता. तो वेद व्याख्याता होता. शिल्प शाखेचा (कलेचा) त्याने विकास केला. तो आयुर्वेद आचार्य होता. इतकेच नव्हे तर आयुर्वेदावर त्यानी एक ग्रंथ लिहिल्याचे पण सांगितले जाते." आचार्य म्हणतात की इतिहास व संस्कृतीच्या संशोधन, अध्ययनात तुमच्या हाती अनेक गोष्टी कालपरत्वे येत असतात. परंतु त्यांचा स्वीकार, अस्वीकार हा समर्थित काय नि त्याज्य काय या सारासार विवेकावरच ठरत असतो. सर्वच समर्थनीय वा सर्वच त्याज्य असे असत नाही. खरा संशोधक कल्पनेतून काहीच आणत नसतो. मला हे सारे वाचत असताना इतिहास आणि संभाव्य सत्याविषयी मागे कुठेतरी ऐकल्या, वाचल्याचे आठवते. विशेषतः ऐतिहासिक चरित्रांचा अभ्यास वा त्यांच्या आधारे साहित्य कृतींची निर्मिती करत असताना संभाव्य सत्याचा परीघ नेहमीच कसोटी ठरत असतो. ते इथेही आचार्यांनी वेगळ्या अंगाने मांडलेले दिसून येते.

 द्रविड कोण होते? हे स्पष्ट करताना हजारीप्रसादांनी सांगितले आहे की द्रविड शब्द जातिवाचक नसून भाषा समूह वाचक आहे. द्रविड आणि कोल, मुंडा जमातीत विलक्षण साम्य आढळते. विशेष करून या सर्वांमध्ये वृक्षपूजा, नरबळी, जीवबळी (पशु), प्रेतपूजा इ. ‘वितर्क'मधील ‘हमारी संस्कृति और साहित्य का संबंध' हा प्रगल्भ निबंध. प्रारंभीच आचार्यांनी सांगून टाकलेले आहे की ‘सभ्यता' आणि संस्कृति' शब्द हिंदीस नवे आहेत. म्हणजे प्राचीन हिंदी साहित्यात ते आढळत नाहीत. त्याचे कारणही तर्कसंगत आहे. ते असे की या संकल्पना तशा प्रबोधन काळानंतरच्या म्हणजे ग्रीक, रोमन संस्कृतीनंतरच्या. रोमन बादशहा कॉन्स्टंटाईनने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतल्यापासून (इ.स. ३१२) ते सोळावे शतक असा काळ प्रबोधनकाळ (Renaissance) म्हणून ओळखला जातो. या काळात 'Civilization' आणि 'Culture' हे दोन शब्द संकल्पना म्हणून मान्य पावले. हिंदीत ते अनुक्रमे ‘सभ्यता’ आणि ‘संस्कृति' या रूपाने रूढ झाले. आचार्यांनी या निबंधाच्या पहिल्या भागात दोन्हीमधील फरक स्पष्ट केला आहे. त्यातून त्यांची वैचारिक पारदर्शिता लक्षात येते.

साहित्य आणि संस्कृती/१०९