पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आचार्यांच्या मतानुसार, सभ्यता चार खांबांवर उभी असते. - १) आर्थिक व्यवस्था २) राजकीय संगठन ३) नैतिक परंपरा ४) ज्ञान आणि कलेचे नियंत्रण. ज्या समाजात पूर्वापार चालत आलेली अव्यवस्था, अनागोंदी, साशंकता, असुरक्षितता यांचा अंत होतो, तिथे सभ्यता नांदू लागली असे आपण म्हणू शकू. समाजातील सामान्य माणसाच्या मनातील भय दूर होऊन कुतूहल, जिज्ञासेस वाव मिळणे हे सभ्य समाज लक्षण होय. सभ्य समाज व्यवस्थेत माणूस पशुसुलभ वर्तनातून मुक्त होऊन सामंजस्य आणि सहानुभूतीचे जीवन कंठू लागतो. एका अर्थाने आपण पाहू लागू तर सभ्यता ही बाह्यरचना आहे. ती माणसाच्या सुख, सुविधांची म्हणजेच खुशालीची काळजी घेते. संस्कृतीच्या तुलनेने सभ्यता निकट भविष्याचा किंवा अल्पकाळाचा विचार होय. ती एक व्यवस्था असते. कायदे, कानून, नियम, बंधन तिचा आधार असतो. सभ्यता बाह्य असल्याने चंचल म्हणजे परिवर्तनशील असते. सभ्यतेच्या कल्पनेत कालपरत्वे बदल होत असले, तरी मूळ मूल्ये कायम असतात. संस्कृती माणसाच्या ज्या आंतरिक विकासाची चिंता वाहते तिचा पायाभूत आधार असतो सभ्यता.

 उलटपक्षी संस्कृती एक अंतर्यामी प्रक्रियेतून आकारते. तिचा आधार इतिहास आणि भविष्य असते. म्हणजे ती इतिहासाच्या पायावर भविष्याची काळजी वाहात असते. संस्कृतीचे चिंतन हे दूरगामी परिणाम करणारे असते. ती सतत सिंहावलोकन करत भविष्यलक्ष्यी प्रवास करत असते. संस्कृती माणसास कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानत असते, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. (खरे तर ती माणसास कायद्याच्या कचाट्यातून सदैव मुक्त मानत असते.) संस्कृती आंतरिक असते, त्याचे मूळ कारण तिचे स्थायित्व होय.

 असे असले, तरी सभ्यता आणि संस्कृतीचा संबंध घनिष्ठ असतो, हे आपण विसरता नये. हे दोन्ही घटक विरोधी नसून परस्परपूरक असतात. जगात वेगवेगळ्या संस्कृती कार्यरत असतात. त्यातील अमूक एक श्रेष्ठ वा दुसरी कनिष्ठ असे असत नाही. खरे वैश्विक संस्कृतींचा विकास हाच आपला ध्यास असायला हवा. सर्व ज्ञान-विज्ञान शाखांचे प्रयत्न खरे तर याच दिशेने होत असतात. या सर्व चर्चेच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संस्कृती कशी आहे, हे पाहणे रोचक (Interesting) ठरावे. पाश्चात्त्य निबंधकार फ्रान्सिस बेकन (इ.स.१५६१ ते १६२६) ने संस्कृतीसाठी ‘मानसिक शेती (Mental Harvesting) शब्दाचा वापर केला आहे. (त्याच्या ‘द एसेज' चे तीन खंड आहेत - १) काउन्सेल्स २) सिव्हिल ३) मॉरल.) यातील शंभराहून अधिक निबंधांमधून बेकननी प्रबोधन कालोत्तर समाज विकासात

साहित्य आणि संस्कृती/११०