पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि उद्या आपल्यालाही तेथे जावे लागणार, हे ध्यानात आले. तेव्हा तिच्या पोटात धस्स झाले. बायका पुरुष एकत्र बसतात आणि मोकळ्या मनाने गप्पा मारतात, ही कल्पनाच तिला चमत्कारिक वाटत होती. रात्रभर तिला झोप आली नाही. नंतर सभेला जाणे, तेथे बोलणे या प्रत्येक वेळच्या तिच्या मनःस्थितीचे हरिभाऊंनी अत्यंत बारकाईने वर्णन केले आहे. सनातन वृत्तीच्या माणसाला स्त्रीचे व्यक्तित्व किती दुःसह होते ते. शंकर मामंजच्या एतदविषयक पत्रावरून स्पष्ट होते. यमुना सभेला गेली यात त्याच्या मनाला मोठा डंख कोणता झाला ? इतके दिवस ही मुलगी म्हणजे शंकररावांची सून असे लोक ओळखीत. आता शंकररावांना हे यमुनेचे सासरे असे लोक ओळखणार ! त्या सनातन पुरुषाच्या पुरुषत्वावर हा केवढा आघात होता.
 निर्भय उत्तर !  यमुना मुंबईला दोन तीन महिने राहिल्यावर सुटीत पुण्याला परत जायची वेळ आली. तेव्हा मुंबईच्या तिच्या वागण्यावर सासरी खूप टीका होणार हे ठरलेलेच होते. यमुना लिहावाचायला शिकली होती. सभेला जात होती. त्यामुळे पुष्कळच धीट झाली होती. पण त्या धीटपणाचे लक्षण काय ते पहा. 'पुण्याला घरी गेल्यावर वेडीवाकडी बोलणी ऐकावी लागतील तेव्हा तू काय करशील ?' असे रघुनाथरावानी विचारले तेव्हा ती म्हणाली, "मी साफ सांगेन, माझ्याकडे काय आहे? जसं सांगितलं तस केले. आम्हांला काय बायकांना ! पदरी पड्डू ते सांगतील तसं वागायच. असं करा असं केलं. तसं नको नाही केलं. आमचा त्यात काही दोष नाही, अस मी साफ सांगेन तितकी वेळ आली, तर मी भ्यायची नाही." 'मला तसं वाटलं म्हणून मी केलं,' असं मी सांगेन असं ती म्हणाली नाही. इकडून सांगितलं. तसं केलं, हे तिच्या मते अगदी निर्भय उत्तर होते. प्रत्यक्षात तेही तिच्याकडून देववले नाही. कारण सासरी भडिमारच तसा भयंकर होता. पण 'इकडून सांगितलं तसं केलं' हे जे तिने ठरविलेले उत्तर तेही तिच्या मानसिक परिवर्तनाचे द्योतकच होते. कारण तेही धैर्य त्या काळी एखाद्या स्त्रीला झाले असते असे नाही, मात्र 'मी' कादंबरीतील ताईच्या अंगी ते धैर्य होते. तिच्यावर प्रसंगच तसा होता. तिचा नवराच तिचा शत्रू होता. पण अशाही स्थितीत जुन्याकाळी स्त्रीला आपण स्वतंत्रपणे काही निराळे करावे धैर्य येणे शक्य नव्हते. शिवरामपंताच्या सहवासात तिच्या मनावर जे नवे संस्कार झाले होते त्यामुळे तिच्या ठायी ते धैर्य आले होते.
 कणखर मन दादासाहेबांच्या घरी राहणे असह्य झाले तेव्हा ती माहेरी निघून आली. तेव्हां कारभाऱ्यांना घेऊन दादासाहेब तिला परत न्यायला आले व ते दोघे अनन्वित बोलून वाटेल त्या धमक्या देऊ लागले. तेव्हा अत्यंत संतापून जाऊन ताई म्हणाली, 'येत नाही, येत नाही. जिथपर्यंत हा मांग घरात आहे आणि ती अवदसा घरात आहे तो पर्यंत त्या घरात मी पाऊल घालायची नाही. कोण माझं काय करतं आहे ते मी पहाते.' ताईवर पुढे असेच प्रसंग आले. तिचे वडील येऊन अद्वातद्वा बोलून तिला सासरी परत जाण्यास सांगू लागले. तेव्हां, 'आता ब्रह्मदेव

९४
साहित्यातील जीवनभाष्य